वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार, सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथील घटना : तुरीच्या शेंगा तोडत असताना केला वाघाने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:52 IST2026-01-30T19:51:56+5:302026-01-30T19:52:09+5:30
प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी सयाम या शुक्रवारी दुपारी पतीसह स्वतःच्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही पती-पत्नी तुरी तोडण्यात व्यस्त असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक लक्ष्मी सयाम यांच्यावर झडप घातली.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार, सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथील घटना : तुरीच्या शेंगा तोडत असताना केला वाघाने हल्ला
राजेश मुनीश्वर/युवराज वालदे
सडक अर्जुनी : शेतात तुरी तोडण्याचे काम करीत असलेल्या मजूर महिलेवर दबा धरुन बसलेल्या वाघाने मागेहून हल्ला करुन ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) दुपारी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील माहुली येथे घडली. लक्ष्मी हेमराज सयाम (वय ६०) रा. माहुली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी सयाम या शुक्रवारी दुपारी पतीसह स्वतःच्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही पती-पत्नी तुरी तोडण्यात व्यस्त असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक लक्ष्मी सयाम यांच्यावर झडप घातली. यानंतर तिचा पती जोराने ओरडला. यामुळे आजबाजुच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी व मजूर धावून आले. त्यांना महिला वाघाच्या तावडीत सापडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने वाघाने महिलेला तिथेच सोडून घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र यात लक्ष्मी सयाम यांचा जागीच मृत्यूृ झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली शेतकऱ्यांनी लगेच याची माहिती सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व डुग्गीपार पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने प्रतिबंधात्मक कारवाई करीत वाघाचा शोध सुरू केला आहे.
घटनेनंतर गावकरी आक्रमक
सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली,सौंदड, बोपाबोडी, सुंदरी, चारगाव परिसरात एक महिन्यापासून एका पट्टेदार वाघाचा वावर आहे. अनेकांना मुख्य रस्त्यावर या वाघाचे यापुर्वी दर्शन झाले आहे. पंधरा दिवसांपुर्वी माहुली येथील दिपाचंद चौधरी या युवकावर वाघाने हल्ला करुन जखमी केले होते. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र पंधरा दिवसात पुन्हा वाघाने हल्ला करुन शेतकरी महिलेचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. घटननेंतर गावकऱ्यांनी आक्रमक होत वाघाचा त्वरीत बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर वन विभागाने वाघाला बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
महिलेच्या कुुटुंबीयांना त्वरित ५० हजारांची मदत
सौंदड सहवनक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक १६९ राखीव वनालगत असलेल्या शेतात लक्ष्मी हेमराज सयाम या महिलेचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून त्वरित ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच नियमानुसार २५ लाख रुपयांची मदत सुध्दा देण्यात येईल असे सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव छबूकांता भडांगे, वनक्षेत्र सहाय्यक युवराज राठोड यांनी सांगितले.