समायोजनामुळे द्विशिक्षकी शाळा एक शिक्षकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:19 IST2019-05-10T21:18:28+5:302019-05-10T21:19:11+5:30
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असतानाच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळांची परवड होताना दिसून येत आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग भरतात. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्गपर्यंत आहे.

समायोजनामुळे द्विशिक्षकी शाळा एक शिक्षकी
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असतानाच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळांची परवड होताना दिसून येत आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग भरतात. प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्गपर्यंत आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेत पटसंख्या निर्धारणानुसार पदवीधर स.शि. तसेच सहायक शिक्षक व मुख्याध्यापकाचे पदभरती केली जात असते. परंतु आजही कित्येक शाळेत पदविधर शिक्षकांचे पद तसेच केंद्रनिहाय केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्यामुळे त्यांचे अतिरिक्त कार्यभार सहायक शिक्षकांना सांभाळावे लागते.
बहुतेक प्राथमिक शाळेत १ ते ४ वर्गसंख्या असून दोन शिक्षक कार्यरत असतात. पटसंख्येअभावी एका शिक्षकाला दोन दोन वर्गाला अध्यापन करावे लागते.
असे असतानाही पं.स.अर्जुनी मोरगाव येथे पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली इयत्ता १ ते ४ मध्ये कार्यरत द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली इतरत्र अध्यापन कार्य करण्यासाठी पदस्थापना दिली आहे. त्यामुळे वर्ग चार, शिक्षक एक अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एका दिवसात, एका शिक्षकाने चार वर्गाचे ३२ तासिका कशा घ्याव्यात? याचे कोडे कुणीही सोडविण्यास तयार नाही. शासनाचे कोणतेही आदेश परिपत्रक नसताना या द्विशिक्षकी शाळेचे एकशिक्षकी शाळेत रुपांतरीत करुन प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे? की सांभाळावे अशी स्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील शिक्षणाची वाट लागली आहे.
या कामांचा शिक्षकांवर भार
चार वर्गाची एकाच शिक्षकाला जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने चारही वर्गाची हजेरी घेणे, गोषवारा भरणे, शालेय पोषण आहाराची जबाबदारी सांभाळणे, रोज कोणती डाळ, हळद, मीठ, मिरची, मोवरी किती वापरले याच्या नोंदी टिपून ठेवणे ते आॅनलाईन नोंद करुन ठेवणे, उपलब्ध नसल्यास प्रतिक्षा करत राहणे, विविध भाषा, गणित विषयक प्रशिक्षणे, मासिक डाक तयार करणे, अध्यनस्तर नोंदणी घेणे, विविध राष्ट्रीय कार्यक्रमासाठी प्रभातफेरी काढणे, स्वच्छता अभियान राबविणे त्याचे नोंदी ठेवणे, तंबाखुुक्त शाळा अभियान राबविणे, नोंदी व छायाचित्रे संकलीत करणे, अध्ययनस्तर नोंदी संकलन करुन आॅनलाईन नोंदविणे, पालक भेटी, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक-पालक समिती यांच्या मासिक सभा घेवून त्यांचे इतिवृत्त जतन करुन ठेवणे, स्थानांतरण प्रमाणपत्र तयार करणे, समग्र शिक्षा अभियान, शाळा सुधार फंड, सादीलवार अनुदान, बांधकाम अनुदान यांचे मासिक जमा खर्चाचे रजिस्टर अद्यावत करणे, आरोग्य विभागासाठी गोवर रुबेला लसीकरण, लोहयुक्त गोळ्या, जंतनाशक गोळ्या, पल्स पोलीओ तसेच मतदार नोंदणीसाठी प्रभातफेरी काढून त्यांचे छायाचित्र अहवाल तयार करणे आदी कामे शिक्षकाला करावी लागत आहे.
अधिकार नसताना आदेश
३० सप्टेंबरच्या निणर्यानुसार पटसंख्येच्या आधारावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे जि.प.गोंदियाचे पत्र असताना अतिरिक्त शिक्षकांना त्याच शाळेत पदविधर शिक्षकाच्या रिक्तपदी पदस्थापना दिलेली आहे.तर काही शिक्षक अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत नसताना त्यांचे स्थानांतरण इतरत्र केलेले आहे. ऐवढेच नव्हे तर माहे जानेवारी २०१८ पासून जि.प.हिंदी, बांगला वरिष्ठ प्राथमिक शाळा, गौरनगरचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक हे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव/स्टे. येथे पदस्थापनेने कार्यरत आहेत. एकीकडे शिक्षकाची कमतरता तर दुसरीकडे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत दोन-दोन उच्चश्रेणी मुख्याध्यापक कार्य करीत आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पदस्थापना करण्याचे कोणतेही प्रशासकीय अधिकार पं.स.ला नसताना मागील १५ महिन्यापासून सदर अतिरिक्त मुख्याध्यापक कार्यरत आहेत.