डॉ. बाजपेयीने केली गोंदियातही अल्पवयीन मुलीची प्रसूती ; प्रियकरासह डॉक्टरवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल
By अंकुश गुंडावार | Updated: March 7, 2026 20:13 IST2026-03-07T20:11:38+5:302026-03-07T20:13:06+5:30
Gondia : येथील डॉ. नितेश बाजपेयी याने गोंदियात जन्मलेल्या एका बाळाची भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणात डॉ. बाजपेयीसह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Dr. Bajpai delivers a minor girl in Gondia; POCSO case registered against doctor along with lover
गोंदिया : येथील डॉ. नितेश बाजपेयी याने गोंदियात जन्मलेल्या एका बाळाची भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणात डॉ. बाजपेयीसह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात एक महिला आरोपीचाही समावेश आहे. तपासादरम्यान पुन्हा एका अल्पवयीन मुलीची प्रसूती गोंदियात करून तिचेही बाळ डॉ. बाजपेयी याने विक्री केल्याचे भंडारा पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी डॉ. बाजपेयी याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये शुक्रवारी (दि. ६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील डॉ. बाजपेयी याने पहिले नवजात बाळ भंडारा जिल्ह्यातील पांढराबोडी गावातील एका महिलेला अडीच लाख रुपयांत विकले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरसह सहा आरोपींना अटक केली. तपासादरम्यान डिसेंबर महिन्यात आणखी एका नवजात बाळाची विक्री केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिसांनी त्या बाळालादेखील ताब्यात घेतले असून तपासात हे बाळ एका अल्पवयीन मुलीचे असल्याचे निष्पन्न झाले. शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील लांजी येथील अल्पवयीन मुलगी येथील डॉ. बाजपेयी याच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी गेली होती. या प्रकरणात डॉ. बाजपेयी यांनी प्रसूती करून हे बाळ भंडारा जिल्ह्यातील मोहगाव येथे चार लाख रुपयांत विकल्याचे समोर आले. मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भंडारा पोलिसांनी रामनगर पोलिस ठाण्यात डॉ. बाजपेयी याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत शून्य गुन्ह्याची नोंद करून प्रकरण रामनगर पोलिसांकडे पाठविले.
प्रियकराला केली अटक
हे प्रकरण १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणात डॉ. बाजपेयी व अल्पवयीन मुलीचा प्रियकर मुकेश मन्सुरे (२२, रा. लांजी) या दोघांवर फिर्यादी सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा राऊत यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ६४, (२) (अ), ३, ५, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४, ६ अन्वये ६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रियकर मन्सुरे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक नागरगोचे करीत आहेत.
प्रसूतीदरम्यान हजर सर्वच डॉक्टर येणार गोत्यात
अल्पवयीन मुलीचे बाळ विक्रीप्रकरणी डॉ. बाजपेयी याने आपल्या मालकीच्या येथील खासगी रुग्णालयात तिची प्रसूती केली. ही प्रसूती करणारे डॉक्टर शहरातील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा देणारे असल्याची माहिती आहे. प्रसूतीच्या वेळी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर, प्रसूती करणारे डॉक्टर व सोनोग्राफी करून घेणारे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर कोण होते, हेदेखील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर लवकरच उघड होईल.