गोंदियातील बालमृत्यू दरात घट

By Admin | Updated: May 6, 2016 01:26 IST2016-05-06T01:26:22+5:302016-05-06T01:26:22+5:30

बालमृत्यूने नेहमी गाजणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी बालमृत्यूदर काही प्रमाणात कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

Decrease in child mortality rate in Gondia | गोंदियातील बालमृत्यू दरात घट

गोंदियातील बालमृत्यू दरात घट

८.१ टक्क्यांनी कमी : उपजत मृत्यूदरही ३.७९ टक्क्यांनी घटला
नरेश रहिले गोंदिया
बालमृत्यूने नेहमी गाजणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी बालमृत्यूदर काही प्रमाणात कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बालकांच्या मृत्यूची संख्या १७४ ने घटली आहे. आता आदिवासी व नक्षलग्रस्त भागातही जनजागृती होत आहे. सन २०१४-१५ या वर्षात बालमृत्यूची संख्या ५४५ होती, परंतु सन २०१५-१६ या वर्षात ३७१ बालमृत्यू झाले आहेत. उपजत मृत्यूमध्येही ३.७९ टक्क्यांनी घट आली आहे.
गेल्या १५ वर्षापूर्वीच्या जन्म व बालमृत्यूची आकडेवारी पाहिल्यास आता मृत्यूदर बराच कमी झाल्याचे दिसून येते. सन २०००-०१ मध्ये जिल्ह्यात ७२० बालकांचा मृत्यू झाला होता. २००८-०९ मध्ये ४८८, सन २०१४-१५ या वर्षात शुन्य ते ६ वर्षातील ५४५ बालकांचा मृत्यू झाला. परंतु सन २०१५-१६ या वर्षात बालमृत्यू दरात घट होऊन ३७१ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यात ग्रामीण भागात २१९ तर शहरी भागात १५२ बालमृत्यू झाले आहेत.
१ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूचा आकडा आता कमी झाला आहे. सन २००० मध्ये १३४ बालकांचा मृत्यू झाला होता. या वयोगटातील सर्वाधिक १७९ बालक २००३-०४ मध्ये दगावले होते.
सन २००६-०७ नंतर बालमृत्यूच्या आकड्यात घट झाली. सन २०१४-१५ मध्ये १ ते ६ वर्ष वयोगटातील ६० बालकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ही संख्या ५१ वर आली आहे.
यात ग्रामीण भागातील ४७ तर शहरी भागातील ४ बालकांचा समावेश आहे.

असे झाले फायदे
जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारी सेवा उत्तम असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली. नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे आरोग्य संस्थेतच प्रसूती करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारली आहे.
गंगाबाईवर लक्ष केंद्रीत करा
जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सर्वात जास्त प्रसूती करण्यात गंगाबाईचा दुसरा क्रमांक आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत. आरोग्य सेविका, परिचर नाहीत. तुटपुंज्या मनुष्यबळावर वर्षाकाठी सात हजारापेक्षा अधिक प्रसुती एकट्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात होतात. त्यासाठी शासनाने गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी शासन दरबारी आपले वजन खर्ची घालावे अशी अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.

आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंदात प्रसुती करण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु एनबीसीसी (न्यू बोर्न केयर सेंटर) मधून सात दिवसात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात एसएनसीयू (सिवर न्यू बोर्न केयर युनिट) असल्यामुळे बाल मृत्यूदरात घट झाली आहे.
-डॉ.संजीव दोडके
वैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया.

Web Title: Decrease in child mortality rate in Gondia