सलग तिसऱ्या दिवशी मिठाची खरेदी करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:30+5:30
येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सलग तिसऱ्या दिवशी मिठाची खरेदी करण्यासाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : संपूर्ण लॉकडाऊनमुळे गुजरात व मुंबईमध्ये मीठ तयार करणारे मजूर आपआपल्या गावाकडे परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मिठाची टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चेमुळे देवरी तालुक्यात २५ किलो वजनाची मिठाची पोती पूर्वी १५० ते १६० रूपयात विकली जात होती. आता तीच पोती २०० ते २५० रूपये दराने विक्री केली जात आहे. देवरी तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात दोन-तीन दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवर गुजरात व मुंबईमध्ये मीठ तयार करणारे मजूर आपआपल्या गावी गेल्याने येत्या काही दिवसात बाजारपेठेत मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरविण्यात आली. छत्तीसगड राज्यातील लोकांनी देवरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फोन करून तातडीने मीठ खरेदी करून ठेवण्याचा सल्ला दिला. या संदेशानंतर देवरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाºया लोकांनी शहरातील सर्व किराणा दुकानातून मिठाची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तर काही दुकानदारांनी या संधीचा फायदा घेत दुप्पट दराने मिठाची विक्री केल्याची माहिती आहे. दहा रुपयांना मिळणाऱ्या मिठाच्या पॉकिटाची विक्री दुकानांमध्ये चक्क ३० रुपयांंना केली जात आहे. दरम्यान मिठाच्या टंचाईच्या अफवेमुळे किराणा दुकानादारांनी आपली चांगलीच चांदी करुन घेतली. मात्र या प्रकाराकडे तालुका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान या प्रकाराची काही नागरिकांनी देवरी येथील तहसीदारांकडे तक्रार केली आहे.
मिठाचा तुटवडा ही अफवा
ज्या ठिकाणी मीठ तयार होते. तेथील मजूर लोक संचारबंदीमुळे आपआपल्या गावाकडे गेल्याने मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा लगतच्या छत्तीसगड राज्यातून पसरविण्यात आली. या अफवेमुळे अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा जास्तीचे मिठाची खरेदी करुन ठेवली. काही व्यापाऱ्यांनी जर जास्ती दराने मिठाची विक्री केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. मिठाचा तुडवडा नसून सगळीकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.
-सोनू अग्रवाल, व्यापारी देवरी