‘स्वच्छ भारत’ अभियान केवळ कागदावरच
By Admin | Updated: November 6, 2014 22:57 IST2014-11-06T22:57:32+5:302014-11-06T22:57:32+5:30
महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही.

‘स्वच्छ भारत’ अभियान केवळ कागदावरच
गावात कचरा-बाहेर घाण : सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर केली जाते घाण
परसवाडा : महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही. भारत स्वच्छ अभियानाबाबत शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत आदी प्रत्येक ठिकाणी अध्यादेशाचे पत्र देण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी शपथही घेतली. पण महिना लोटल्यावरही अनेक कार्यालये, गाव व रस्त्यावरची घाण स्वच्छ झाली नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाच्या वतीने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. ते त्या संबंधित भाषण देऊन मोकळे झाले. परंतु अशाने देश व गाव स्वच्छ होणार नाही. जे पदाधिकारी स्वत:ला जनतेचे सेवक समझतात, त्यांनी तरी किंवा त्यांच्या कुंटुबीयांनी तरी घरासमोरील नालीतील कचरा स्वच्छ केला आहे का? फक्त फोटो काढून वर्तमानपत्रात किंवा टी.व्ही. चॅनलसमोर हातात झाडू घेवून उभे राहून स्वच्छता होत नाही. आताची जनता हुशार व समझदार आहे. किमान या बाबी तरी जनता समजू शकते, एवढी बुद्धी त्यांच्यात आहेच.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी ा संत गाडगेबाबा यांनी स्वत: कार्य केले. परिश्रम घेतले. नंतरच त्यांनी त्याबाबत उपदेश केला. त्यांनी आधी केले व करताकरताच सांगितले. त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडून त्यांचे विचार नागरिकांनी आत्मसात केले होते. त्यांनी देशाची शान राखली. त्यांनी खोटे बोलून कधीही फसवेगिरी केली नाही. त्यामुळे जनता त्यांना आजही अभिवादन करते.
परंतु त्यांच्या नावावर सरकार कार्यक्रम राबवूनही जनता, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना ते जमले नाही. निर्मल भारत स्वच्छता अभियानाच्या नावावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. पण एक रुपयाचाही फायदा होत नाही. शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा. हा पैसा अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या घशात जावून एकही गाव हवे तसे निर्मल झाले नाही. काही ठिकाणी तर अभियानच राबविण्यात आले नाही. पण निर्मल गावाचा पुरस्कार अनेक गावांनी मिळविले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील जुण्या झोपडपट्टीकडे बघितले तर कचरा गावाबाहेर, १०० मीटर अंतरापासून घाणच घाण, शासकीय कार्यालयातील शौचालयात गेले तर बघूनच होत नाही. गुटखा, तंबाखू व पान खावून थुंकण्याचे रंगीबेरंगी चिन्हे आढळतात. स्वच्छता अभियानातही शाळा, शासकीय परिसर, आरोग्य विभागातील रूग्णालये, उपकेंद्रातील परिसर बघण्यासारखे आहेत. शासन करोडो रुपये खर्च करते. कर्मचारी अधिकारी खर्च करतात. पण कचरा ट्रालीने असतो. हिरवा कचरा वाळूनही काढला जात नाही. ग्रामीण भागात एक म्हण सतत म्हटली जाते, ‘खेड्याची वस्ती, घाणीसाठी रस्ती.’ ही खरोखरच लाजीरवाणी बाब आहे.
सकाळ व संध्याकाळ प्रत्येक गावात रस्त्यावर पुरूष व महिला शौचालयासाठी रस्त्यावर बसतात. पण पुरूषवर्ग तर ठाण बसून असतो. पण ज्यांना आपण लक्ष्मीदेवी यासारखी अनेक नावे देतो, ती रस्त्यावर बसून सतत ‘स्टँड अप, सिट डाऊन’ करीत असते. आजही ग्रामीण भागातील महिलेची हिच व्यथा आहे.
जोपर्यंत पदाधिकारी, अधिकारी व जनता आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत गावे स्वच्छ होवून देश स्वच्छ होवू शकणार नाही. अन्यथा स्वच्छता अभियान हे केवळ कागदावरच राहूत त्याचा लाभ होवू शकणार नाही. (वार्ताहर)