७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:38 IST2018-06-27T00:37:00+5:302018-06-27T00:38:23+5:30

७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली.या अभियानातंर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध कामे करण्यात आली. यामुळे ही गावे वॉटर न्युट्रल झाली असून या गावांमधील भूजल पातळीत सुध्दा अर्धा ते एक मीटरने वाढ झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ७७ गावे वॉटर न्युट्रल झाली आहेत. यात आमगाव तालुक्यातील ९ गावे, सडक-अर्जुनी १०, देवरी ११, सालेकसा ८, तिरोडा ९, गोरेगाव ११, गोंदिया १० व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी साठ्याची क्षमता २०५४२.०६ टीसीएम आहे. तर प्रत्यक्ष निर्माण झालेला पाणीसाठा २०६९६.८८ टीसीएम आहे. त्यामुळे १४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ च्या प्रगती अहवालानुसार, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुधारित प्रस्तावित कामांची संख्या २७६३ होती. २७५९ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. तर सर्व योजना मिळून २७५२ कामांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. २७४९ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात २६२३ कामे सुरू करून २६१९ कामे पूर्ण करण्यात आली. चार कामे प्रगतीपथावर आहे.