शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !

By अंकुश गुंडावार | Updated: September 11, 2025 20:13 IST2025-09-11T20:05:43+5:302025-09-11T20:13:07+5:30

मोहगाव जि.प. शाळेतील प्रकार : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली निलंबनाची कारवाई

Children roamed around the village during school hours? villagers went to school and saw a drunken teacher in the temple of knowledge? | शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !

Children roamed around the village during school hours? villagers went to school and saw a drunken teacher in the temple of knowledge?

देवरी (गोंदिया) : शाळा हे विद्येचे मंदिर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला येथूनच कलाटणी मिळत असते. शालेय वयात शिक्षकांनी केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडत असतात. अशा या पवित्र स्थळाला एका शिक्षकाने कलंक फसला आहे. दारूच्या नशेत वर्गातच शिक्षकाने झिंगाट केल्याचा प्रकार १० सप्टेंबर रोजी देवरी तालुक्यातील मोहगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी गुरुवारी (दि. ११) त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. आर. एस. बहेकार असे निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि. १०) शाळा सोडून मुले गावात फिरत असल्याने शाळेत काय सुरू आहे हे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता वर्गामध्ये शिक्षक आर.एस. बहेकार दारूच्या नशेत धुंद असून टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर झोपून असल्याचे आढळले. शिक्षक इतका मद्यधुंद अवस्थेत होता की वर्गात गावकरी आल्याचे भानही त्याला नव्हते. १० सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी मद्यधुंद अवस्थेत पाहिले. तसेच त्या शिक्षकाचे मद्यधुंद अवस्थेत असलेले व्हिडीओ गावकऱ्यांनी तयार केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याची माहिती गावकऱ्यांनी शिक्षण विभागाला दिली. याचीच गांभीर्याने दखल घेत गुरुवारी (दि. ११) शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली.

"मी व गावकऱ्यांनी शाळेत भेट दिली तेव्हा शाळेतील शिक्षक आर.एल. बहेकार दारू पिऊन खुर्चीवर झोपले असल्याचे आढळले. या शिक्षकास यापूर्वीही गावकऱ्यांनी सूचना देऊनसुद्धा हा शिक्षक आपले वर्तन सुधारत नसल्याने यावर कायदेशीर व कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही गावकऱ्यांनी केली आहे."

- हंसराज वालदे, ग्रामपंचायत सदस्य
 

चिचगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम.एस. मोटघरे यांच्या आदेशानुसार शाळेचे मुख्याध्यापक नीलेश सोनवणे यांनी शिक्षक आर.एस. बहेकार यांच्याविरुद्ध चिचगड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यापूर्वी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या मदतीने गावकऱ्यांनी पोलिस स्टेशन चिचगड येथे नेले होते. चिचगड पोलिसांनी शिक्षकाचे मेडिकल करून मुख्याध्यापक सोनवणे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ अंतर्गत मद्यधुंद शिक्षक आर.एस. बहेकार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

"मोहगाव जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक हे मद्यप्राशन करून कर्तव्यावर असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी मिळाली. यानंतर गुरुवारी (दि. ११) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे."

- सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
 

वर्षभर दिली होती सुधारण्याची संधी

पंचायत समिती देवरी अंतर्गत अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षक असून २२ विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. गेले वर्षभर शिक्षक आर.एस. बहेकार या शिक्षकाला सुधारण्याची गावकऱ्यांनी संधी दिली. मात्र दारूच्या आहारी गेलेल्या शिक्षकामध्ये कुठलीच सुधारणा झाली नाही.

Web Title: Children roamed around the village during school hours? villagers went to school and saw a drunken teacher in the temple of knowledge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.