केंद्र सुरू मात्र धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:58+5:30
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वत्र कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे धान खरेदी उशीरा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

केंद्र सुरू मात्र धान खरेदी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : रब्बी हंगामातील धान खरेदी ४ मे पासून सुरूवात झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे जाहीर केले. पण नवेगावबांध येथील बाजार समितीच्या आवारातील धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी अद्यापही धान खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने मागील तीन दिवसांपासून ५५० क्विंटल धान खरेदी केंद्रावर येऊन पडून असून त्याचा अद्यापही काटा करण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वत्र कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे धान खरेदी उशीरा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
४ मे पासून जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी एकूण ७० शासकीय धान खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नवेगावबांध येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल धान विक्रीसाठी ४ मे रोजी आणले. मात्र या खरेदी केंद्रावर अद्यापही या धानाची खरेदी करण्यात आली नाही. परिणामी हे शेतकरी मागील तीन दिवसांपासून धानाचा काटा होईल या प्रतीक्षेत आहेत. त्यातच बुधवारी सायंकाळच्या सुमारास या परिसरात पाऊस झाल्याने काही प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्राचे संचालक यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. अशा शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन एकीकडे धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगत आहे. मात्र दुसरीकडे खरेदी केंद्रावर धान नेऊन त्याचा तीन तीन दिवस काटा करण्यात येत नसल्याने शेतकºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आधीच शेतकरी लॉकडाऊन, संचारबंदी व नैसर्गिक संकटांना तोंड देत आहेत. अशात आता त्यांना खरेदी केंद्रावरील कर्मचाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे पुन्हा नव्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
धर्मकाट्यावर करा खरेदी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी धर्मकाट्यावर धानाची मोजणी करुन खरेदी करण्यात यावी. यामुळे गर्दी टाळून खरेदीची गती वाढविण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर विचार करुन धर्मकाट्यावर धान खरेदी करण्याची मागणी केली जात आहे.
मी ४ मे रोजी ६५ पोते धान नवेगावबांध येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणले. मात्र अद्यापही धानाचा काटा करण्यात आला नाही. परिणामी दररोज धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून धानाचा काटा होत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावा.
- माधव डोंगरवार (शेतकरी)