तिरोडा तालुक्यातील पोलीस पाटील पदभरती रद्द करा

By Admin | Updated: December 18, 2015 02:23 IST2015-12-18T02:23:33+5:302015-12-18T02:23:33+5:30

तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली.

Cancel the recruitment of Police Patil in Tiroda taluka | तिरोडा तालुक्यातील पोलीस पाटील पदभरती रद्द करा

तिरोडा तालुक्यातील पोलीस पाटील पदभरती रद्द करा

गोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र या पदभरतीला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचा आरोप करीत सदर पदभरती रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी पोलीस पाटील पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यासाठी एकूण ३२४ अर्ज प्राप्त केले. मात्र या अर्जांची छानणी न करताच ७ नोव्हेंबर २०१५ रोजी तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालय या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परंतु परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. पेपर कसे सोडवावे याची माहितीसुद्धा देण्यात आली नाही.
परीक्षा झाल्यावर दोन तासांनी निकाल देणे आवश्यक होते. परंतु उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी निकाल देण्यास चार ते पाच दिवस लावले. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले. उपविभागीय कार्यालयात १० नोव्हेंबर २०१५ रोजी पोलीस पाटील परीक्षेला निकाल लावण्यात आला. मात्र त्यातही पात्र परीक्षार्थ्यांचे केवळ बैठक क्रमांक देण्यात आले होते. कुणाला किती गुण मिळाले व त्यांची नावेसुद्धा जाहीर करण्यात आले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी नावांची यादी लावण्यात आली. मात्र गुण दर्शविण्यात आले नाही. तेथील कारकून टेंभुर्णे यांनी लेखी व तोंडी दोन्ही मिळून गुणांची यादी लावण्यात येईल, असे सांगितले होते.
पोलीस पाटील भर्ती २०१५ अंतर्गत गृहविभागाच्या परिपत्रकानुसार (शासन निर्णय-बी.व्ही.पी. १११३/१७६७/प्रक्र५९२/दि.२२ आॅगस्ट २०१४) पोलीस पाटील पदासाठी दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा वस्तूनिष्ट व बहुपर्यायी स्वरूपाची राहील. त्यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश, असे स्वरूप आहे. पण गोंदिया जिल्ह्याचे केवळ पाच प्रश्न दिले, चालू घडामोडीवर केवळ दोन ते तीन व इतर सर्व प्रश्न गणित, इंग्रजी, मराठी व्याकरण व महाराष्ट्र स्तराचे होते. पोलीस पाटील पदासाठी इंग्रजी विषय नसतानाही त्यात चार प्रश्न इंग्रजीचे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cancel the recruitment of Police Patil in Tiroda taluka