वनपरिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ
By Admin | Updated: November 9, 2014 22:33 IST2014-11-09T22:33:16+5:302014-11-09T22:33:16+5:30
नवेगाव/नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत ईडीसीमार्फत ग्राम परिस्थिती विकास समितीतून मेळावे घेवून विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात वनविभाग, कृषीविभाग,

वनपरिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ
काचेवानी : नवेगाव/नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत ईडीसीमार्फत ग्राम परिस्थिती विकास समितीतून मेळावे घेवून विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात वनविभाग, कृषीविभाग, पशूसंवर्धन विभाग व आदिवासी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे आयोजन नवेगाव/नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रकल्पाधिकारी (वनसंरक्षक वन्यजीव) ठवरे यांनी केले होते. मंगेझरी व कोडेबर्रा येथील मेळाव्याला जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कुरील, देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे, एसीएफ नागझिराचे नरेश खंडाते, तिरोड्याचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश गंगापारी, तिरोड्याचे तालुका कृषी अधिकारी प्रकाश पोटदुखे, मंगेझरीचे सरपंच अनुसया कुंभरे, सातपुडा फाऊंडेशन नागझिऱ्याचे मुकुंदा धुर्वे, नागझिरा वनसमितीचे अध्यक्ष मुन्ना सरोटे व ग्रा.पं. सदस्य दिनेश टेकाम उपस्थित होते.
सदर मेळाव्याच्या माध्यमातून जंगली परिसरातील गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनोपयोगी गरजा व शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध योजना याची माहिती देण्यात आली. नवेगाव/नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनात, यापूर्वी जंगलामध्ये राहणारे शेतकरी व ग्रामस्थ जंगलावरच अवलंबून राहत होते. लाकूड तोडून आपले जीवनयापन करीत होते. मात्र कालांतराने हे बंद झाले. आता लाकूड तोडू शकत नाही. त्यासाठी इंधनाची सुविधा व्हावी म्हणून गॅस सिलिंडरची व्यवस्था शासनाने उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळू गायींसाठी शासकीय अनुदानासाठी १० लाख रूपयांची व्यवस्था शासनाने केली आहे. यातून २० हजार रूपये दुधाळू गायीसाठी व २० हजार रूपये शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेवून कुटुंबाचा विकास करावा, असे ते म्हणाले. जिल्हा कृषी अधीक्षक अशोक कुरील यांनी सांगितले की, कृषी विभागाच्या माध्यमातून भातखाचर कामे, शेततळे तयार केली जातात. त्यांचा उपयोग पाण्याचा साठवण करण्यासाठी करता येईल आणि कसे करावे, याबाबत माहिती सांगितली. शिवाय चाऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने शेती करावी. तसेच कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी बियाने, खत, यंत्रे आदी स्वस्त दरात उपलब्ध होतात. त्यांचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी सरोदे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यात सुशिक्षीत विद्यार्थ्यांसाठी पोलीस व मिल्ट्री भरतीत विशेष सहयोग, प्रशिक्षणाकरिता प्रोत्साहन भत्ता, शिक्षणासाठी मदत, शिष्यवृत्ती आदिंची माहिती सांगितली. शेतकऱ्यांसाठी पंपसुविधा, यंत्रसुविधा अशा अनेक योजनांचा लाभ आदिवासी प्रकल्पांतर्गत दिल्या जाते. त्यांचा उपयोग करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. तिरोड्याचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. गंगापारी यांनी दुधाळू गाई-म्हशी आदी जनावरांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे संगोपन कसे करावे, जनावरांसाठी पौष्टिक चारा किंवा आहार कसे तयार करावे व द्यावे, दुधात वाढ कशी होते, जनावरांचे आजार व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनुसया कुंभरे होत्या. कोडेबर्राच्या मेळाव्याचे संचालन मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी तर मंगेझरीच्या मेळाव्याचे संचालन पर्यवेक्षक डी.एस पारधी यांनी केले. (वार्ताहर)