रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:16 IST2024-05-07T18:16:00+5:302024-05-07T18:16:51+5:30
दुष्काळात तेरावा महिना: खरिपात बसणार मोठा आर्थिक फटका

Again increase in the price of chemical fertilizers
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.
शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ, खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे. इतरही खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असून या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
आर्थिक गणित कोलमडणार
खत, बियाणे, रोजगार, अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे.
मात्र शेतमालाचे बाजारभाव स्थिर अन् घटतेच आहेत. गेल्या दोन वर्षांपासून धानाचा हमीभाव अडीच हजारांच्या खालीच आहेत.
त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र आहे.
खताचे पूर्वीचे व सध्याचे दर
खते सध्याचे दर खतांचे जुने दर
१०-२६-२६ १७०० १४७०
२४-२४-० १७०० १५५०
२०-२०-०-१३ १४५० १२५०
सुपर फॉस्फेट ६०० ५००
उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.
- निहारीलाल दमाहे, शेतकरी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम आपल्या देशात दिसून येतो. युरिया साधारणपणे १५ ते २० टक्के, पोटॅश १०० टक्के, सुपर फॉस्फेट ६० ते ७० टक्के बाहेरील देशातून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती
वाढल्याचा परिणाम देशात जाणवतो.
- मनीष रहांगडाले, खत विक्रेता
मजुअरीतही वाढ
एकीकडे खतांसह इतर कृषी निविष्ठांच्या किमती गगनाला भिडत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहेच, शिवाय दरवर्षी मजुरीतही मोठी वाढ होत आहे. त्यात वेळेवर कामासाठी मजूरही मिळणे कठीण असल्याने शेती करावी की, नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.