९१ हजार चिमुकले करणार बीज संकलन

By Admin | Updated: May 5, 2016 01:40 IST2016-05-05T01:40:12+5:302016-05-05T01:40:12+5:30

चिमुकल्यांच्या हातून रानावनातील व शेतातील विविध झाडांचे बीज संकलन करून आपापल्या शाळेत रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करावा,

9 1 thousand sparrows will collect seeds | ९१ हजार चिमुकले करणार बीज संकलन

९१ हजार चिमुकले करणार बीज संकलन

वृक्षसंवर्धनासाठी घेतला पुढाकार
नरेश रहिले गोंदिया
चिमुकल्यांच्या हातून रानावनातील व शेतातील विविध झाडांचे बीज संकलन करून आपापल्या शाळेत रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करावा, असे पत्र शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते १२ पर्यंतचे ९१ हजार १४२ विद्यार्थी आता बीज संकलन करून त्याची रोपवाटिका तयार करणार आहेत. वृक्ष संवर्धनातून पर्यावरण रक्षणाचा हा अनोखा उपक्रम नवीन शैक्षणिक सत्रात राबविला जाणार आहे.
बालमनावर जसे संस्कार रूजवले तसाच तो व्यक्ती घडत जातो. लहानपणापासून शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रमही मुलांनी राबवावे यासाठी जिल्हा परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. ग्लोबल वार्मिंगची समस्या घर करून आहे. वृक्षांचा झालेला विनाश पाहून आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करणे ठरविले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या किंवा सुट्या संपताच विद्यार्थ्यानी आपापल्या परिसरातील बीज संकलन करून वर्गशिक्षकाच्या माध्यमातून रोपवाटिका टाकली जाणार आहे. त्या रोपवाटिकेचे रोपटे त्या विद्यार्थ्याना गावातीलच परिसरात रस्त्यावर, मायरानावर, टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात वर्ग १ ते १२ वी पर्यंत ९१ हजार १४२ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी बीज संकलन करून रोपटे लावणार आहेत. आमगाव तालुक्यात ९ हजार ६५०, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १० हजार ४६५, देवरी ६ हजार ७७४, गोंदिया २३ हजार ९००, गोरेगाव ९ हजार ७४०, अडक-अर्जुनी ८ हजार १९६, सालेकसा ७ हजार ९३४, तिरोडा १४ हजार ४८३ विद्यार्थी बीज संकलन करणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया केली जाणार आहे.

वनीकरण विभागाला मागितले दीड लाख रोपटे
यंदा बीज संकलनाचा कार्यक्रम जि.प. शाळांच्या माध्यमातून घेऊन वृक्ष लागवड केली जाणार आहे. परंतु जि.प. शाळांकडे एवढे रोपटे उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ व वनविभागाला पत्र पाठवून दीड लाख रोपटे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सर्वशिक्षा अभियानातील बिसेन यांनी सांगितले.

Web Title: 9 1 thousand sparrows will collect seeds