शासकीय क्वारंटाईन कक्षात ६९ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:49+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.

शासकीय क्वारंटाईन कक्षात ६९ जण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ७ क्वारंटाईन कक्षात सध्या ६९ जण उपचार घेत आहेत. यात जिल्हा क्र ीडा संकुल येथे २०, एमएस आयुर्वेदिक महाविद्यालयात १७, ग्राम चांदोरी येथे ११, तिरोडा येथील लिटल बर्ड कान्व्हेंट येथे पाच, ग्राम डव्वा येथील समाज कल्याण निवासी शाळेत सहा, ग्राम इळदा येथील शासकीय आश्रमशाळेत पाच तर ग्राम बिरसी उपकेंद्र येथे पाच अशा एकूण सात क्वारंटाईन कक्षात ६९ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २५९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.
तर २६ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात सध्या ‘जैसे थे’ आदेश
गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असला तरी जिल्हा प्रशासनाने आठवडाभरापूर्वी आदेश काढून काही प्रमाणात शिथिलता दिली होती. तेच आदेश कायम आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह, इलेक्ट्रीक, चष्मे, पंखे आदी दुकाने उघडण्यासाठी बुधवार, गुरूवार, शुक्र वारी या तीन दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यत परवानगी आहे. जिल्ह्यातील बस सेवा सुरू करण्याबाबत सुद्धा अद्याप निर्णय झाला नाही. दारु दुकाने सुरू करण्याबाबत अद्याप आदेश काढण्यात आले नसून त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील निमशासकीय व बँक कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.