तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:35 IST2025-05-02T07:35:17+5:302025-05-02T07:35:59+5:30
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. त्यामुळेच शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे.

तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
गोंदिया : सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून निघून निसर्ग सान्निध्यात आपला वेळ घालविण्यासाठी नागरिकांची पावले आता जंगलांकडे वळू लागली आहेत. विशेष म्हणजे, व्याघ्र प्रकल्पात वाघोबांचा अधिवास असून त्यांचे हमखास दर्शन होते. हेच कारण आहे की, वर्ष २०२४-२५ मध्ये (मार्च ते एप्रिल) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ३६ हजार ५९२ पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केली आहे.
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. त्यामुळेच शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे.
जून महिन्यात सर्वाधिक पर्यटक
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला जात असून, एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र, असे असतानाही जून महिन्यात सर्वाधिक आठ हजार ३३४ पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये पाच हजार ४६ पर्यटकांनी ऑफलाइन बुकिंगद्वारे, तर तीन हजार २८८ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंगद्वारे व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, जंगल सफारीचा आनंद लुटला आहे.
छायाचित्रणातून मिळाला महसूल
जंगल सफारीसाठी जात असताना कित्येक पर्यटकांना वन व वन्यजीवांचे फोटो काढणे तसेच त्यांचे व्हिडीओ शूटिंग करणे आवडते. यासाठी कित्येक साधा कॅमेरा वापरतात कित्येक जण सिने कॅमेरा वापरत असून जंगल सफारीचे शूटिंग करतात.
अशातच साधा कॅमेरा वापरणाऱ्या पर्यटकांकडून चार लाख ८१ हजार ४८४ रुपये, तर सिने कॅमेरा वापरणाऱ्या पर्यटकांकडून ३० हजार ८४९ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी प्रवेश शुल्कापोटी वर्षभरात वनविभागाला ९४ लाख ६० हजार ९० रुपयांचा महसूल मिळाला आहे.
पर्यटकांची महिनानिहाय आकडेवारी अशी...
महिना ऑफलाइन ऑनलाइन
एप्रिल १९३६ ८६२
मे ४९५० २५०८
जून ५०४६ ३२८८
ऑक्टोबर ९११ ३६१
नोव्हेंबर २६३९ १७७७
डिसेंबर २८३४ २०१२
जानेवारी १९५५ ८९५
फेब्रुवारी १२२३ ५१०
मार्च १६९७ ११८९