वनरक्षकपदाच्या ८१ जागांसाठी ३० हजार बेरोजगार इच्छुक

By Admin | Updated: October 15, 2015 02:08 IST2015-10-15T02:08:02+5:302015-10-15T02:08:02+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र दलाच्या स्थापनेसाठी ८१ वनरक्षकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

30 thousand unemployed aspirants for 81 posts of forest guard | वनरक्षकपदाच्या ८१ जागांसाठी ३० हजार बेरोजगार इच्छुक

वनरक्षकपदाच्या ८१ जागांसाठी ३० हजार बेरोजगार इच्छुक

बेरोजगारीचा भस्मासूर : भरती प्रक्रियेसाठी २०० कर्मचारी तैनात
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र दलाच्या स्थापनेसाठी ८१ वनरक्षकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या २१ पदांसाठी राज्यभरातून तब्बल ३० हजार ४०३ उमेदवारांनी आवेदन केले आहे. उमेदवारांची शारीरिक चाचणी १६ आॅक्टोबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.
नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील वाघांच्या संरक्षणासाठी व वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा बसावा यासाठी नागपूर वनवृत्तातील गोंदिया वनविभागाच्या आस्थापनेवरील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात येत आहे. त्यासाठी नव्याने वनरक्षकांची ८१ पदे निर्माण करण्यात आली असून पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर पदभरतीसाठी राज्यभरातून तब्बल ३० हजार ४०३ बेरोजगारांनी अर्ज केले. यावरून राज्यात बेरोजगारीचा भस्मासूर किती फोफावला आहे, याचा प्रत्यय येतो. व्याघ्र प्रकल्प गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा असला तरी संपूर्ण राज्यभरातून या भरतीच्या शर्यतीत उमेदवार उतरले आहेत. जागा कमी आणि उमेदवार खूप जास्त असल्याने त्यांच्यात स्पर्धा कमालीची वाढली आहे. त्यामुळे पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
दोन ठिकाणी शारीरिक चाचणी
उमेदवारांची संख्या वाढल्याने गोंदियात त्याची चाचणी घेणे कठीण झाले. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील १४ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी (दौड) गोंदिया येथे घेण्यात येत आहे. तर राज्यभरातील उर्वरित जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांची चाचणी नागपूर येथे घेण्यात येत आहे. गोंदिया येथील शारीरिक चाचणी प्रक्रियेत पोलीस विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग व वन विभागातील २०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या नियंत्रणात ही प्रक्रिया सुरू आहे.
प्रवर्गनिहाय भरण्यात येणाऱ्या जागा
अनुसूचित जातीसाठी ११ जागा, अनुसूचित जमाती सहा, विजाअसाठी दोन, भजबसाठी दोन, भजपसाठी तीन, भजडसाठी दोन, विमाप्रसाठी दोन, इतर मागासवर्गीयांसाठी १५, खुल्या प्रवर्गासाठी ३८ अशी एकूण ८१ पदे निर्माण करण्यात आली. यापैकी २६ पदे महिलांसाठी, ११ पदे माजी सैनिकांसाठी, चार पदे खेळाडूंसाठी, चार पदे होमगार्डसाठी, सात पदे अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी, सात पदे रोजंदारी मजुरांसाठी तर सर्वसाधारण गटासाठी १८ पदे मंजूर आहेत.

Web Title: 30 thousand unemployed aspirants for 81 posts of forest guard