गोंदिया : जिल्ह्यातील सहकार विभागाकडे जिल्ह्यात ११५ अधिकृत सावकार असल्याची नोंद आहे, पण त्यांनी किती शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले याची माहितीच उपलब्ध नसल्याने कर्जवाटपाचा आकडा गुलदस्त्यात आहे.
जिल्ह्यातील बरेच शेतकरी बँका तसेच अधिकृत व अनधिकृत सावकारांकडून कर्जाची उचल करतात. यासाठी दागिने अथवा शेती गहाण ठेवत असतात. अधिकृत सावकारांना कर्ज वाटप करण्यासाठी शासनाने दर ठरवून दिला असला तरी यापेक्षा ५ ते ६ टक्के अधिक व्याजदर आकारला जातो. तर अनधिकृत सावकारांची कुठेच नोंद राहत नसल्याने त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. अशा सावकारांची संख्या जिल्ह्यात ३०० वर असून ते वर्षाकाठी १०० ते १५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करतात. त्यांचा व्याजदर प्रतिशेकडा ३ ते ४ रुपये आहे. त्यामुळे बरेचदा उचल केलेल्या मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाची रक्कम अधिक भरावी लागते. यातूनच आलेल्या नैराश्यापाेटी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतात. अधिकृत सावकाराने आपल्या दुकानासमोर त्याचे फलक लावणे, त्यावर व्याजदराची माहिती लिहिणे अनिवार्य आहे.
अनधिकृत सावकारी
जिल्ह्यात अनधिकृत सावकारांचा आकडा हा ३०० च्या वर आहे. ते प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी व गरजूंना शेकडा ३ ते ४ रुपये व्याजदराने कर्ज देतात. तर गरज पाहून व्याजाच्या दरात वाढही केली जाते. हे जवळपास वर्षाकाठी शंभर ते दीडशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करीत असल्याची विश्वसनीय माहिती असून त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
वर्षात १४ आत्महत्या
मागील वर्षात जिल्ह्यातील १४ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गोंदिया जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादकांचा जिल्हा असून शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने बरेच शेतकरी हंगामासाठी बँका व सावकारांकडून कर्जाची उचल करतात. नापिकी आणि नैसर्गिक संकटामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही.अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषीतारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.