झेडपींना समूह शेतीचे अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:23 IST2026-01-04T14:22:01+5:302026-01-04T14:23:45+5:30
३,९५० शेतकऱ्यांना ३ कोटी ६८ लाखांची नुकसान भरपाईचे वाटप

झेडपींना समूह शेतीचे अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यातील जिल्हा पंचायतींना समूह शेती उपक्रम राबविण्यासाठी विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. शेती हा केवळ उपजीविकेचा नव्हे, तर नफ्याचा व्यवसाय व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारून समूह शेतीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी रवींद्र भवन येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ३,९५० शेतकऱ्यांना ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप केले. कार्यक्रमास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, महेश सावंत, पद्माकर मळीक, जिल्हा पंचायत सदस्य कुंदा मळीक, दया कारबोटकर, निलीमा गावस यांच्यासह कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
बदलत्या हवामानामुळे आज शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र शेतकऱ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही, कारण सरकार तुमच्या पाठीशी आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत केली जाईल. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
'स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा' ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आता जिल्हा पंचायतींना समूह शेतीची संकल्पना चालना देण्याचे अधिकार बहाल करण्यात येईल. समूह शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणारी असून आमोणा, कुडणे, नावेलीत नवा प्रयोग सुरू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी राज्यातील कृषी व्यवस्थापन व विविध योजनांची माहिती दिली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृषी खात्याला आदेश देऊन मदत त्वरित वितरित होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिल्याचेही ते म्हणाले.
सरकारने अवकाळी पावसामुळे १ झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. त्यामुळे तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे, असे आमदार चंद्रकांत शेट्ये म्हणाले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यावर काही दिवसांपासून आर्थिक मदत जमा होण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्यांना मदत मिळते, ते अनेकदा ती मिळाल्याची माहिती देत नाहीत. सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर असून मुख्यमंत्री लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी विविध योजना मार्गी लावू : सावंत
शेतकऱ्यांनी आज पारंपरिक शेतीपुरती मर्यादित न राहता वेगवेगळे पर्याय शोधावेत. हळद लागवड, गुरांच्या खाद्यासाठी फोडर लागवड, चवळी, हळसांदेसह इतर पिकांची लागवड व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक नफ्यात येऊ शकते, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठीही जिल्हा पंचायतींना विशेष अधिकार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा पंचायत सदस्यांनी शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृषीकार्ड नसलेल्या १,२०० शेतकऱ्यांनाही मदतीचा हात
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते. आज ते पूर्ण करत आहोत. ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही, अशा १,२०० शेतकऱ्यांनाही सरकारने मदत दिली असून बहुतेकांना मदत मिळालेली आहे. जर कोणी उरले असतील, तर त्यांना येत्या दोन दिवसांत खात्यावर मदत जमा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.