४० मतदारसंघांत कमळ निशाणी; भाजपा दहा मतदारसंघ इतरांना सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:58 IST2025-12-04T11:54:40+5:302025-12-04T11:58:15+5:30
अपक्ष उमेदवारांसाठी सात, तर मगोला तीन जागा

४० मतदारसंघांत कमळ निशाणी; भाजपा दहा मतदारसंघ इतरांना सोडणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण ५० पैकी ४० जागा स्वतः लढवणार असून उर्वरित १० जागा इतरांना देईल. त्यामुळे आणखी दोन उमेदवार पक्षाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. मोरजी, कवळे आणि वेलिंग-प्रियोळ हे तीन मतदारसंघ मगोपला देण्यात आले आहेत. ७ मतदारसंघांमध्ये भाजप अपक्षांना पाठिंबा देणार आहे.
आतापर्यंत पक्षाने ३८ उमेदवार जाहीर केलेले आहेत. सत्तेत मित्रपक्ष असलेल्या मगोपला तीन जागा देण्याचे आधीच ठरलेले आहे. मगोपने हे जागावाटप मान्य केले आहे. भाजपला दक्षिण गोव्यात काही ठिकाणी उमेदवार मिळवणे कठीण गेले. नुवे, बाणावली, वेळ्ळी, गिर्दोली व इतर तीन मिळून सात ठिकाणी भाजप अपक्षांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना तीन जागांवर पक्ष आपले उमेदवार उद्या, शुक्रवारी जाहीर करील, असे सांगितले.
शिरोड्यात मंत्री शिरोडकर यांच्या कन्येला तिकीट
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने तिसरी यादी जाहीर केली असून नऊ मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित केले आहेत. शिरोडा मतदारसंघात डॉ. गौरी सुभाष शिरोडकर यांना तिकीट दिले असून त्या जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या कन्या होत. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ३८ वर पोचली आहे. आणखी दोन उमेदवार लवकरच जाहीर होतील.
आरजीची बैठक
काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आक्रमक बनलेल्या आरजीने पक्षाच्या निवडणूक समिती व कोअर कमिटीची संयुक्त बैठक काल, बुधवारी रात्री बोलावली होती. काँग्रेसने विश्वासघात केल्याची टीका आरजी प्रमुख मनोज परब यांनी केली आहे.
काँग्रेस, आरजी, फॉरवर्ड यांच्यात समन्वयाचा अभाव
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी होईल का? याबाबत अद्यापही अनिश्चिततेचे वातावरण आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर विश्वासघाताचे आरोप आणि अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे विरोधकांनी एकत्र यावे असे वाटणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी अजूनही पक्षांतर्गत चर्चेने अंतिम निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विरोधकांची रणनीती काय असेल आणि आघाडीची शक्यता आहे का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
...म्हणून विरोधकांनी एकत्रच असायला हवे : विजय सरदेसाई
'तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्यक्ष युतीच्या विषयावर एकत्र अशी एकदाच बैठक झालेली आहे. त्यानंतर आरजीचे नेते काँग्रेसकडे जागांबाबत स्वतंत्रपणे बोलत होते. त्यामुळे त्यांच्यात काय बोलणी झाली होती, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. युतीच्या बाबतीत काँग्रेसने आता काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात' असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर आरजी आघाडीपासून दूर जात असल्याचे जे चित्र निर्माण झाले आहे, त्याबद्दल विचारले असता सरदेसाई म्हणाले की, 'गोवा फॉरवर्डबद्दल विचारत असाल तर भाजप विरोधी मते फुटू नयेत यासाठी विरोधकांनी एकत्र यावे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.
फेस्ताच्या निमित्ताने सेंट फ्रान्सिस झेवियरकडे आजही मी हीच प्रार्थना केली आहे. काँग्रेसबरोबर गोवा फॉरवर्डची युती २०२२ च्या निवडणुकीपूर्वीची आहे. तीही जर तुटायची असेल तर त्याबद्दल आणखी न बोललेलेच बरे. कोणाला युती हवी आहे व कोणाला नकोय, हे गोव्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे.'