पर्तगाळमधील श्रीराम मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात; महोत्सवाच्या तयारीला वेग, श्रीराम दिग्विजय रथ दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:47 IST2025-11-24T11:46:42+5:302025-11-24T11:47:48+5:30
मूर्तीचे काम २५ रोजीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पर्तगाळमधील श्रीराम मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात; महोत्सवाच्या तयारीला वेग, श्रीराम दिग्विजय रथ दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पैंगिण : पर्तगाळी येथे उभारण्यात येणाऱ्या ७७ फूट उंचीच्या भव्य आणि आकर्षक अशा श्रीरामाच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्तगाळी मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामींनी भेट देऊन कामाची पाहणी करून माहिती घेतली. मूर्तीचे काम २५ रोजीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पर्तगाळी मठाजवळच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खास हेलिपॅड उभारण्याचे काम चालू आहे, त्या कामाचीही पाहणी स्वामींनी केली. यावेळी महोत्सवाच्या आयोजनासाठी सरकारी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, बांधकाम आणि आयोजनावर देखरेख ठेवणारे दिनेश पै, अभय कुंकळ्येकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मूर्तीचे, मुख्य मंडपाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. वाहन तळ आणि भोजन कक्षाचे काम देखील पूर्णत्वाकडे आलेले आहे. पंचशताब्दी महोत्सवानिमित्त श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळीकडून बद्रीनाथ येथून सुरू करण्यात आली श्री राम दिग्विजय रथयात्रेचे काल पोळेमार्गे गोव्यात आगमण झाले. रथाचे उत्साहात स्वागत झाले.
या महोत्सवाच्या कामात देशाच्या विविध भागातील शेकडो कामगार गुंतले आहेत. या कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम काणकोणचे सामाजिक आरोग्य केंद्र करीत आहेत. दोन वर्षांपासून इमारत बांधणी, सफाई, 3 रंगकाम, फर्निचर तयार करणे, रस्त्याचे काम आणि अन्य कामासाठी विशेषतः बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतून आलेल्या जवळ-जवळ १००० कामगार येथे काम करतात.
काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून 3 त्यांची आरोग्य तपासणी केली जाते, अशी माहिती आरोग्य निरीक्षक प्रणय नाईक यांनी दिली. तपासणी पथकात नाईक यांच्यासह, डॉ. दिवाकर वेळीप, मनोज तारी, जितेंद्र काणकोणकर व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रामनाम जप सुरू करण्यात आलेल्या गोकर्ण येथील ९१ व्या केंद्राला या रथाने भेट दिल्यानतंर २१ रोजी हा रथ कारवारला पोहोचला व पोळेमार्गे गोव्यात दाखल झाला.