विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:33 IST2025-07-02T13:30:53+5:302025-07-02T13:33:14+5:30
बी. एल. संतोष यांना भेटून केली गोव्यातील विषयांवर सविस्तर चर्चा

विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दिल्लीत आहेत. आज, बुधवारी ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. काल, मंगळवारी राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. गोव्यातील विविध विषयांवर संतोष यांनी राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
राणे यांनी गोव्यातील राजकीय स्थितीविषयी संतोष यांना माहिती दिली. शिवाय बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातील डीन पदाच्या विषयाबाबतही माहिती दिली, असे राजकीय सूत्रांनी सांगितले. डीन शिवानंद बांदेकर यांना निवृत्तीनंतर सेवावाढ मिळावी, असा प्रयत्न राणे यांनी केला होता. राणे हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. अन्य काही केंद्रीय नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या.
दरम्यान, गृहमंत्री शहा यांना मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे एकत्र भेटले. लोबो यांना सोबत घेऊन या, अशी सूचना शहा यांनीच केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सावंत हे मायकल लोबो यांना घेऊन गेले होते. लोबो यांची भेट यशस्वी झाली आहे. यापुढे जेव्हा मंत्रिमंडळ फेररचना होईल, त्यावेळी लोबो किंवा त्यांची पत्नी डिलायला यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, असे समजते. दरम्यान, याबाबत आमदार मायकल लोबो यांनी 'लोकमत'शी बोलताना मात्र अजून काही ठरलेले नाही असे काल सांगितले.
मंत्री विश्वजीत राणे हे आज शहा यांना भेटून त्यांच्याशी काही विषयांबाबत चर्चा करणार आहेत. राणे यांना 'लोकमत'ने याविषयी विचारले असता, त्यांनी आपण भेटणार असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू द्यावा व कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यावे हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे ठरवतील. त्यानंतर ते आपल्या प्रस्तावाला केंद्रीय नेत्यांची मान्यता घेतील. काल मुख्यमंत्री सावंत व आमदार मायकल लोबो हे केंद्रीय गृहमंत्री शहा यांना भेटले तेव्हा मंत्रिमंडळाच्या फेररचनेवर शिक्कामोर्तब झालेले नाही. अजून खूप चर्चा होणे बाकी आहे. फेररचना होईल, पण ती विधानसभा अधिवेश पार पडल्यानंतर.
अधिवेशनाच्या तोंडावर फेररचना झाली व तीन-चार नवे आमदार मंत्रिमंडळात आले किंवा पूर्ण खाते बदल झाला तर अधिवेशनात नव्या मंत्र्यांची विरोधक अडचण करतील याची कल्पना पक्षाच्या नेत्यांना आहे. अधिवेशन पार पडल्यानंतर मग नवे सभापती कोण असावे किंवा तवडकर किंवा दिगंबर कामत किंवा इतरांना मंत्रीपद द्यावे की नाही ते निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्या इच्छेनुसारच मंत्रिमंडळाची फेररचना होईल, अशी माहिती मिळाली.
अधिवेशन होईपर्यंत मंत्रिमंडळ जैसे थे राहणार: सभापतिपदी तूर्त तवडकरच
विधानसभा अधिवेशन या महिन्यात सुरू होणार आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. अधिवेशन पार पडेपर्यंत गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना होणार नाही. फेररचनेबाबतचा अंतिम निर्णयही अजून दिल्लीत झालेला नाही. त्यामुळे सभापतीपदी तूर्त रमेश तवडकर हेच राहतील.
फेररचनेविषयी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राजकीय विषयांवर चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु, मंत्रिमंडळ फेररचना किंवा खातेबदल कधी होईल, असे विचारले असता केवळ स्मित हास्य केले. ते म्हणाले की, 'मी व आमदार मायकल लोबो यांनी अमित शाह यांची भेट घेतली. गोव्यातील काही विकासाच्या मुद्यांवर तसेच राजकीय विषयांवरही चर्चा झाली.'
मी गृहमंत्र्यांना भेटलो, तेव्हा मला कळाले की गोव्यावर त्यांचे बारीक लक्ष आहे. देशातील प्रत्येक राज्यातील राजकीय माहिती त्यांच्याकडे असते. गोव्याविषयी त्यांनी अधिक माहिती जाणून घेतलीच. मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय अजून झालेलाच नाही. त्याबाबत निश्चित व अंतिम असे काही ठरलेले नाही. पुढील काळात मुख्यमंत्री कदाचित फेररचनेचा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना पाठवतील. - मायकल लोबो, आमदार