“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:12 IST2025-10-10T13:08:38+5:302025-10-10T13:12:37+5:30
Union Minister Ramdas Athawale Reaction On CJI Bhushan Gavai Incident: कुठल्याही दलितांवर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे गुन्हा आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
Union Minister Ramdas Athawale Reaction On CJI Bhushan Gavai Incident: सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना अचानक सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडला. एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यात मधेच एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले. या वकिलाचे नाव राकेश किशोर असून, या कृत्याबाबत आपल्याला खंत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेवर भाष्य केले आहे.
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ही घटना अतिशय निषेधार्ह आहे. सरन्यायाधीश भूषण गवई दलित समाजाचे आहेत. त्यांचे वडील राज्यपाल होते. भूषण गवई यांनी चांगले शिक्षण घेऊन लोकांच्या मदतीने पुढे गेले. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी काम केले. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. आता ते भारताचे सरन्यायाधीश झाले आहेत. ही गोष्ट सवर्ण समाजातील लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला.
सरन्यायाधीश गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न
या घटनेचा निषेधही केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी ताबडतोब फोन करून याची माहिती घेतली आणि या घटनेचा निषेध केला. मीही या घटनेचा निषेध करतो. आधीच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे दलित असल्यानेच त्यांच्यावर सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊन कारवाई व्हावी. कुठल्याही दलितांवर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, असा प्रयत्न मी करीन, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जिंकणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय पार्टी महायुती मिळून लढणार आहोत आणि बहुतांश ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला खूप मोठे यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत आमचे नुकसान झाले. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचा फेक नरेटिव्ह पसरवला होता. या निवडणुकीत त्यांचीच सत्ता येईल, असे त्यांना वाटत होते. परंतु, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २०२९ लाही आमचे एनडीएचे सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधकांना जे काही आरोप करायचे आहेत, ते त्यांना करू दे. आम्ही मात्र आमचे काम करत राहणार. मतचोरीचा मुद्दा आता ते उकरून काढत आहेत. परंतु, असे आरोप आधारहीन आहेत. राहुल गांधी यांना मते मिळत नसल्यामुळे असे दावे केले जात आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आमची एनडीए आघाडी विजयी होईल, असेही रामदास आठवले म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना धन्यवाद देतो की, येथील गरीब, दलित आणि बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना सोबत घेऊन ते गोव्याचा विकास करत आहेत, असे आठवले यांनी नमूद केले.