आदिवासी संस्कृती देशाचा खरा मजबूत पाया: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:52 IST2026-01-10T12:50:51+5:302026-01-10T12:52:11+5:30
काणकोणात 'आदी लोकोत्सव'

आदिवासी संस्कृती देशाचा खरा मजबूत पाया: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई
लोकमत न्यूज नेटवर्क, खोतिगाव: आदिवासी समाज ज्या गोष्टी करत होता त्या गोष्टीचा आम्ही शोध घेऊन वैज्ञानिक दृष्टीने अंमल करू लागलो आहोत. देशाच्या विकासात आदिवासींच्या ज्ञानाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संस्कृतीत निसर्गाशी नाते, परिश्रम आणि प्रामाणिकपणा दडलेला आहे. त्यांच्या या विविधांगी ज्ञान व कला उत्सवांमुळे आदिवासी समाजाची ओळख देश-विदेशात पोहोचली आहे, असे प्रतिपादन छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी केले.
आदर्श युवा संघ, श्री बलराम शिक्षण संस्था तसेच कला व संस्कृती संचालनालय, आदिवासी संशोधन संस्था आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी 'आदी लोकोत्सव आदर्शग्राम'चे आमोणे-पैंगीण काणकोण येथे पारंपरिक मातीचा द्वीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. रौप्यमहोत्सवी लोकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री डॉ. रमेश तवडकर, हैदराबाद येथील भाजप खासदार कोम्पेला माधवीलता, राजस्थान येथील एस. टी. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व जहालपूर-कोठडी मतदारसंघाचे आमदार गोपीचंद मीणा, पैंगिण जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, पैंगिण सरपंच सविता तवडकर, काणकोण नगरपालिका नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, आगोंद सरपंच नीलेश पागी, लोलये सरपंच निशा च्यारी, आदर्श युवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वेळीप, खोतिगाव सरपंच जयेश गावकर, काणकोण भाजप मंडळ अध्यक्ष प्रभाकर गावकर व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री तवडकर यांनी मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रकांत वेळीप यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे संजय गावकर यांनी सांभाळली.
आदिवासी समाज सक्षम
आदिवासी समाज तसा प्रत्येक क्षेत्रात सक्षम आणि क्रियाशील आहे. त्याने सातत्याने आपली ओळख टिकवण्यासाठी कार्य केले असून आदिवासी समाजाने तसेच कार्यरत राहावे, असे आवाहन हैदराबाद येथील भाजप खासदार कोम्पेला माधवीलता यांनी केले.
लोकोत्सव एक व्यासपीठ : तवडकर
'आदी लोकोत्सव' हा केवळ उत्सव नसून आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, कला आणि जीवन पद्धतीचे जतन व संवर्धन करणारे व्यासपीठ आहे. आदर्श युवा संघाने गेल्या अनेक वर्षांत ग्रामीण व आदिवासी भागात युवकांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. या कार्यातूनच आज 'आदी लोकोत्सवाने' राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली असे, मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले.