लाचखोरांना पाठीशी घालण्याची परंपरा अबाधित, आयपीएस विमल गुप्ताची चौकशी ऐवजी गोव्यातून बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:32 IST2017-12-05T20:32:14+5:302017-12-05T20:32:31+5:30
पणजी: एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलवर लाचखोरीचे आरोप झाले तर मागचा पुढचा विचार न करता त्याला सेवेतून निलंबित केले जाते.

लाचखोरांना पाठीशी घालण्याची परंपरा अबाधित, आयपीएस विमल गुप्ताची चौकशी ऐवजी गोव्यातून बदली
पणजी: एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलवर लाचखोरीचे आरोप झाले तर मागचा पुढचा विचार न करता त्याला सेवेतून निलंबित केले जाते. परंतु वरिष्ठ अधिकारी आणि त्यातल्या त्यात आयपीएसवाल्यांच्या लाचखोरीचे पुरावे जरी सादर करण्यात आले तरी त्यांची बदली करून प्रकरण मिटविले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लाचखोरी प्रकरणात अडकलेले उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांची चौकशी करण्या ऐवजी बदली करण्यात आली आहे.
खात्यांतर्गत चौकशीतून वाचविण्यासाठी 40 हजार रुपये मागितल्याचा आरोप महिला उपनिरीक्षकाकडून उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्यावर करण्यात आल्यानंतर गुप्ता यांची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणा-याच महिलेला निलंबित करण्याचा आदेश पोलीस खात्याकडून देण्यात आला. तेही गुप्ता यांनी दिलेल्या जबानीला अनुसरून. आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे गुप्ताने म्हटले होते आणि तेही त्या महिला उपनिरीक्षकाने आपण लाच दिल्याचे सांगितल्यानंतर.
आयपीएस अधिका-यांना पाठीशी घालण्याची ही पहिली वेळ नसून या घटनेने पोलीस खात्याने ही परंपरा अबाधित राखली आहे. यापूर्वी महानिरीक्षक सुनील गर्ग याने गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यासाठी 5 लाख रुपये लाच मागितल्याचा गंभीर आरोप मुन्नालाल हलवाई या नागरिकाकडून करण्यात आला होता. केवळ आरोप केला नव्हता तर लाच देण्याच्या प्रकरणात गर्ग यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते आणि त्यांचे संभाषणही टीपण्यात आले होते. हे पुरावे सादर करून तक्रारही करण्यात आली होती. परंतु त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याऐवजी त्याला गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा यासाठी तक्रारदार अजूनही न्यायालयीन लढाई लढत आहे.
काही वर्षांपूर्वी गोव्यात दुदू ऊर्फ डेव्हिड द्रिहम नामक इस्नयली ड्रग डिलरला अंमलीपदार्थाच्या मोठ्या साठ्यासह रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाचाही बेजबाबदारपणा उघडकीस आल्यामुळे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी विभागाचे कॉन्स्टेबल, उपनिरीक्षक यांच्यासह ब-याच जणांना निलंबित करण्यात आले होते, परंतु या विभागाचे अधीक्षक आयपीएस अधिकारी वेणू बन्सल यांच्यावर कारवाई न करता केवळ बदली करण्यात आली होती.