पर्यटकांसाठीची रेल्वे आठवड्यातून दोनदा

By Admin | Updated: December 22, 2014 01:49 IST2014-12-22T01:47:53+5:302014-12-22T01:49:53+5:30

आज महत्त्वाची बैठक : ३ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा विचार

The train for the tourist twice a week | पर्यटकांसाठीची रेल्वे आठवड्यातून दोनदा

पर्यटकांसाठीची रेल्वे आठवड्यातून दोनदा

पणजी : मुंबई-गोवा मार्गावर पर्यटकांसाठीची खास रेलगाडी येत्या २ किंवा ३ जानेवारी रोजी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रश्नावर रेल्वे अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्याबरोबर सोमवारी होत आहे. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल एजन्सींच्या प्रतिनिधींनाही बैठकीत सामावून घेऊन त्यांच्याकडून मते जाणून घेतली जातील.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार रेल्वे बोर्डाचे अधिकारी तसेच कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक भानू पी. तायल या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. परुळेकर या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, डेक्कन ओडिशीसारखी महागडी नको; पण सर्वसाधारण मध्यमवर्गीय पर्यटकांनाही परवडेल, असे भाडे असलेली रेल्वे गोव्याला हवी आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोनवेळा ही रेलगाडी गोव्यात येईल, नंतर फेऱ्या वाढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पर्यटन खाते आणि कोकण रेल्वे महामंडळ यांच्यात समझोता करार केला जाईल, असे ते म्हणाले. नाताळ, नववर्षसारख्या सणासुदीच्या काळात गाड्यांना प्रचंड गर्दी असते. विमानाची तिकिटेही वाढलेली असतात त्यामुळे पर्यटक गोव्यात येऊ शकत नाहीत. खास पर्यटकांसाठीच अशी रेलगाडी सुरू केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा परुळेकर यांनी व्यक्त केली. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतलेली असल्याचेही परुळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The train for the tourist twice a week