काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:52 IST2025-10-17T08:48:19+5:302025-10-17T08:52:01+5:30
सरकारकडून डोळस कारभाराचा अभाव; तिसरी पिढी घेते उत्पन्न

काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा पोहोचवण्याचे सरकारचे तंत्रज्ञान खाते सक्षमपणे कार्यरत असले तरी प्रत्यक्षात डोळस कारभाराचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील काजू आणि आंबा बागायती असलेल्या जमिनी टॉवर उभारणीसाठी कंपन्यांना देण्यात येत असून शेतकऱ्यांना हुसकावून लावत आहे. त्यामुळे काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट कोसळल्याने स्थानिक शेतकरी व बागायतदारांमध्ये संताप उसळला आहे.
आमदार जीत आरोलकर यांना ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या भागात कोणतीही कंपनी पुढे येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १६ रोजी संबंधित कंपनीचे अधिकारी व कामगार पोलिस बंदोबस्तासह दाखल झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या कंपनीचा अधिकारी स्थानिक नागरिकांना मामलेदार कार्यालयातून काम बंद करण्यासाठी नोटीस आणल्यानंतर काम बंद करू असे सांगतो. मात्र, काम सुरू करण्यासाठीची नवीन ऑर्डर दाखवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
तिसरी पिढी घेते उत्पन्न
केपकरवाडा येथील डोंगर व बागायती क्षेत्रात एका कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास सरकारने परवानगी दिल्याचे समजते. सदर जागा विनोंडकर कुटुंबीयांची असून त्यांची तिसरी पिढी काजू व इतर पिकांचे उत्पादन घेत आहे. त्या जागेवरील हक्कासाठी त्यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयात अर्ज दाखल केले असून, टॉवर उभारणीस हरकत नोंदवली आहे. मात्र, प्रशासनाकडून या अर्जावर विलंब होत असल्याने प्रक्रिया रखडली आहे.
सरकार कोणत्या अधिकारावर शेतकऱ्यांच्या लागवडीच्या जमिनी टॉवरसाठी हस्तांतरित करते. शेतकरी कष्ट करून जमीन विकत घेतो, मात्र सरकार उत्पन्नाचे साधन हिरावत आहे. - नारायणदास विर्नोडकर, ज्येष्ठ नागरिक.
सदर जागेपासून काही अंतरावरच सरकारची मालकीची जमीन असून, त्या जागेत सरकारी इमारती आणि कार्यालये आहेत. तेथेच टॉवर उभारावा. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आणून नये. - गंगाराम केपकर, ग्रामस्थ.
या टॉवरमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडेल तसेच आरोग्यविषयक समस्या वाढतील. एकदा का ही जागा ताब्यात गेली की संपूर्ण डोंगराचा नाश होईल. - प्रेमदास विर्नोडकर, स्थानिक युवक.