सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:16 IST2025-03-06T13:08:32+5:302025-03-06T13:16:02+5:30

१७ नंतर मंत्रिमंडळ फेररचना? दामू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.

those who did not cooperate should be punished b l santosh goa visit made it clear | सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट

सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ बदल हवाच, अशी ठाम भूमिका भाजप नेतृत्वाने गोवा भेटीवर आलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडे स्पष्ट केली. काही मंत्री पक्षाला सहकार्य करीत नसल्याचे संतोष यांच्या निदर्शनास आणून दिले. सहकार्य न करणाऱ्या मंत्र्यांचा डच्चू निश्चित असून, येत्या १७ तारखेनंतरच मंत्रिमंडळ फेररचना होण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे संतोष यांनी तब्बल ४० मिनिटे वन टू वन चर्चा केली. पक्षाचे गोव्यात कसे काय काम चालले आहे, तसेच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार, मंत्री लोकांना न्याय देत आहेत की नाही, याची माहिती घेतली. दामू यांनी आपली काही निरीक्षणे ठामपणे संतोष यांच्याकडे नोंदवली.

प्राप्त माहितीनुसार कार्यकर्त्याच्या भावना संतोष यांच्यापर्यंत पोहोचवून मंत्रिमंडळात बदल आवश्यक असल्याची ठाम भूमिका स्थानिक पक्ष नेतृत्वाने घेतली आहे.

काही मंत्र्यांचे पक्षाला सहकार्य मिळत नाही, हे आता लपून राहिलेले नाही. अलीकडेच पक्षाची सदस्यता मोहीम झाली. त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. नुवे मतदारसंघाचे काँग्रेसचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे पक्ष नेतृत्वाला वाटते. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला २७०० मते मिळाली. पक्ष सदस्य नोंदणीतील नुवेत २ हजारांचा आकडा पार करता आला नाही.

मी माझी भूमिका ठामपणे मांडलीय : दामू नाईक

दामू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. मी याबाबतीत पक्षाची ठाम भूमिका संतोष यांच्यासमोर मांडलेली आहे. या विषयावर मी आणखी काही बोलू इच्छीत नाही.'

काब्राल, कामत यांची वर्णी शक्य

दरम्यान, सिक्वेरा यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेतले होते. आगामी मंत्रिमंडळ फेररचनेत त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकते. दिगंबर कामत यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. काब्राल यांनीही मंगळवारी बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष १७ रोजी निवडला जाण्याची शक्यता असल्याने त्यानंतरच गोव्यात मंत्रिमंडळ बदल होऊ शकतो.

 

Web Title: those who did not cooperate should be punished b l santosh goa visit made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.