नगरसेवक पुत्राचे कुकर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:25 IST2026-03-24T13:24:20+5:302026-03-24T13:25:00+5:30
पेडणे, बार्देश अशा काही तालुक्यांमध्ये रात्रीच्यावेळी गाजणाऱ्या पार्ट्यांमध्ये राज्यातील अनेक गर्भश्रीमंतांचे मुलगे व मुली सहभागी होत असतात.

नगरसेवक पुत्राचे कुकर्म
गोवा हे सुशिक्षित राज्य. मात्र या राज्यातील काही युवकांना कधी वडिलोपार्जित श्रीमंतीचा माज चढलेला असतो तर कधी सत्तेच्या जवळीकतेमुळे हे तरुण मदांध झालेले असतात. ज्या वयात स्वतःला सावरायचे असते, त्या वयात काही युवक कॅसिनोसारख्या जुगाराच्या आहारी जातात. काहीजण ड्रग्जच्या नशेत जीवनाचा मार्ग चुकतात. गोव्याच्या किनारी भागात असा अनुभव येतोच. पेडणे, बार्देश अशा काही तालुक्यांमध्ये रात्रीच्यावेळी गाजणाऱ्या पार्ट्यांमध्ये राज्यातील अनेक गर्भश्रीमंतांचे मुलगे व मुली सहभागी होत असतात.
रात्री जागरणे करायची व पहाटे कधी तरी घरी परतायचे असे प्रकार केले जातात. काही वर्षांपूर्वी अशाच पार्टीहून घरी येताना गोव्यातील एका माजी आमदाराचा तरुण मुलगा अपघातात ठार झाला होता. गोव्यात सध्या एका नगरसेवकाच्या वीस वर्षीय मुलाचे प्रकरण गाजतेय. संतापजनक असे सेक्स स्कैंडल कुडचडे व परिसरात अत्यंत तापलेले आहे. विषय केवळ एका मुलाचा नाही तर एकंदरीत सामाजिक अधःपतन केवढ्या वेगात सुरू आहे ते कळून येण्यासाठी हे प्रकरण पुरेसे आहे. नगरसेवक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे किंवा नाही हा महत्त्वाचा विषय नाही. शेवटी कोण कोणत्या पक्षाचे काम करतोय यावरून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील तरुणांचे चारित्र्य निश्चित होत नसते.
काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा काँग्रेसवाल्यांच्या कुटुंबातील काहीजणांचे वेगळे पराक्रमदेखील चर्चेस येण्याच्या घटना घडल्या होत्याच. आता ज्या नगरसेवकाच्या युवा मुलाचे प्रकरण गाजतेय, त्यात वडिलांचा काही दोष नसेलही. मात्र आपला मुलगा बाहेर कसा वागतो, कुणाबरोबर फिरतो, तो कोणते चांगले किंवा वाईट काम करतो, लोक त्याच्याविषयी काय बोलतात; याबाबत पालकांनी कायम सतर्क असावेच लागते. मुलाला वळण लावण्याचे, योग्य मार्गदर्शन करण्याचे काम शेवटी शिक्षकांप्रमाणे पालकांचेही असते.
श्रीमंतांची लाडावलेली मुले व्यसनी होतात तेव्हा शेवटी आई वडिलांनाच मनःस्ताप भोगावा लागतो. समाजालाही मनःस्ताप होतो. कुडचडे येथील सेक्स स्कँडल विषयावरून समाज पेटून उठला आहे. लोकांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळेच अखेर पोलिस यंत्रणा सक्रिय झाली. शेवटी रविवारी रात्री नगरसेवकाच्या मुलाला अटक झाली आहे. सोहम नाईक असे या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला आहे. मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याचे चित्रिकरण करून ते प्रसारित करणे ही मोठी विकृती आहे. म्हणजे युवतींच्या जीवनाशी क्रूर खेळ मांडण्याचा हा प्रकार आहे. ज्या युवर्तीचे शोषण झाले, त्यांना समाजात अपमानित करून स्वतः उजळ माथ्याने फिरत होता. शेवटी बिंग फुटलेच.
महाराष्ट्रात गेले काही दिवस कॅप्टन अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरण प्रचंड गाजत आहे. त्या प्रकरणी चक्क महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. एक-दोघांना अटकही झाली आहे. अनेक राजकारण्यांचेही धाबे नाशिकच्या या प्रकरणामुळे दणाणले आहे. तशातच गोव्यातील सेक्स स्कँडल उघड झाले. कुडचडेतील चर्चेनुसार अल्पवयीन मुलींचेदेखील शोषण झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी तक्रार करायला मुली पुढे आल्यानंतर प्रकरणाची एकूण व्याप्ती कळून येईल. किती प्रमाणात सत्यता आहे तेही स्पष्ट होईल.
पोलिसांनी जास्त राजकीय दबाव न घेता चौकशी सुरू केली हे चांगले झाले. अगोदर अश्लील व्हिडीओ काढायचे आणि नंतर ते व्हायरल करून त्याचा आनंद लुटायचा, ही माफ करण्यासारखी विकृती नाहीच. दुसऱ्यांच्या मुलींना आयुष्यातूनच उठविण्याचा हा प्रकार झाला. यातून कुणी आत्महत्या केल्या तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रकरणी या युवकाला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, फातोर्थ्याचे आमदार विजय सरदेसाई व इतरांनी पोलिसांकडे केलेली मागणी महत्त्वाची आहे. पोक्सोखाली व बाल कायद्याखाली गुन्हा नोंदवावा अशी लोकांची मागणी आहे. पोलिसांनी टाळाटाळ करू नये. कारण एकाला दणका बसला तरच इतरांमधील गुन्हेगारी वृत्तीला चाप बसेल. कुडचडेचे प्रकरण उघडकीस आले, पण काही वर्षांपूर्वी फोंड्यातही असेच प्रकरण घडले होते, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र त्यावेळी समाजाचा उठाव झाला नव्हता.