युद्धाची मोठी नांदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:44 IST2026-01-08T13:44:44+5:302026-01-08T13:44:44+5:30
गोव्याची उरलेली भूमी, पर्यावरण, पर्वत, टेकड्या, शेतजमिनी यांचे संरक्षण केले तरच पर्यटन योग्य पद्धतीने वाढू शकेल.

युद्धाची मोठी नांदी
माझ्या गोव्याच्या भूमीत,
गड्या नारळ मधाचे,
कड्या कपारीमधूनी,
घट फुटती दुधाचे...
गोवा आणि गोंयकारपण हे देशात वैशिष्ट्यपूर्ण. कविश्रेष्ठ स्वर्गीय बा. भ. बोरकर यांनी मनोहारी गोव्याचे सार्थ वर्णन आपल्या सोनेरी शैलीत करून ठेवले आहे. राज्याची निसर्गसंपदा, पर्यावरण, शेते-भाटे, ग्रामीण जीवन, लोककला व लोकसंस्कृती हे सगळेच अनोखे, अनुपम आहे. मधाचे नारळ देणारे माड कापून टाकले आणि कड्याकपारीमध्येही काँक्रीटची जंगले उभी केली तर पुढची पिढी आताच्या पिढीला माफ करणार नाही. यामुळेच नदी, जंगल, जमीन, हिरवागार निसर्ग हे सारे राखून ठेवावे लागेल. युनिटी मॉलविरुद्ध आदिवासी बांधवांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. कारण सरकारने विविध क्षेत्रात खेळ मांडलेला आहे. अक्राळविक्राळ प्रकल्प हे तळी, नाले यांच्या परिसरात आणले जातात. गोव्याची उरलेली भूमी, पर्यावरण, पर्वत, टेकड्या, शेतजमिनी यांचे संरक्षण केले तरच पर्यटन योग्य पद्धतीने वाढू शकेल.
विकास व पर्यावरण यांच्यात समतोल हवाच. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत गोव्याची निसर्गसंपदा टप्प्याटप्प्याने नष्ट होत आली आहे. ती कशी ? जुन्या सचिवालयाकडे उभे राहून १९९६ सालचा काळ आठवा. मांडवी नदी शांत होती, कॅसिनोचे एक देखील जहाज नव्हते. तिथे मच्छीमार बांधव तेवढे दिसायचे. समोर बेतीची पूर्ण हिरवीगार टेकडी दिसायची. तिथे ९६ साली काँक्रीटचे बांधकाम सुरू झाले. टेकडी कापायला सुरुवात झाली. पहिल्यांदा एकच छोटे बांधकाम आले, मग हळूहळू दोन वर्षांत पूर्ण टेकडी नष्ट झाली. एकमेकाला टेकून अनेक बांधकामे उभी राहिली, कुणी त्यावेळी बोलले की हे टाटांचे बांधकाम आहे. अर्थात टाटा की बाटा ते कुणाला ठाऊक नाही, पण आता तिथे डोंगर नाहीच, तिथे फक्त बांधकामेच आहेत. पर्वरी मतदारसंघात चला, ताळगाव मतदारसंघात फिरा किंवा सांतआंद्रेत जाऊन पाहा, बांबोळीला मोठ्या बिल्डरांनी मगरमिठीत घेतले आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी फक्त आल्दीया दी गोवाचे बांधकाम उभे राहत होते, आता बांबोळीचा सगळा डोंगर नष्ट झालाय, हे मडगावहून दोनापावलला जाताना दिसून येते. २००० साली मांडवी नदीत केवळ एकच कॅसिनो जहाज आले होते, आज २०२५ साली सगळे कॅसिनो जुगाराचे अड्डेच अड्डे दिसून येतात. हजारो वाहने रात्री पणजीतील रस्ते अडवतात. रस्त्याच्या बाजूनेही फिरता येत नाही. हे कुठंवर सहन करायचे? की घरोघरी कॅसिनोच सुरू राहिलेले राज्यकर्त्यांना हवे आहे? पेडणेसारखा तालुका अत्यंत हिरवागार होता.
मोरजी-हरमलसह सगळीकडे टेकड्यांवर बांधकामे उभी राहत आहेत. सेकंड होम कल्चरचा गोवा बळी ठरू लागलाय, तोही अत्यंत वेगाने. धारगळला एक दिवस सनबर्न महोत्सव होईल अशी कल्पनादेखील कुणी केली नव्हती; मात्र राज्यकर्त्यांनी आपल्या बळाचा वापर करून गेल्यावर्षी तिथे सनबर्न आयोजित करायला मोकळे रान दिले गेले.
युवा पिढीने अशा सनबर्नमध्येच झिंगावे असे राज्यकर्त्यांना वाटते काय? २००७साली डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी गोवा वाचविण्यासाठी चळवळ सुरू केली होती. त्यावेळी गोव्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर होते. गोव्याच्या हिताविरुद्ध आणला गेलेला प्रादेशिक आराखडा तेव्हा सरकारला मागे घ्यावा लागला होता. तो परिणाम जनतेच्या चळवळीचा होता. एकदा सांताक्रूझच्या आमदार स्वर्गीय व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी पीडीओ व ओडीपींच्या आक्रमणाविरुद्ध आंदोलन केले होते. तेव्हा राज्यात दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर होते. ओडीपी रद्द करावे लागले होते. तो विजयही लोकआंदोलनाचा होता. आता निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी युद्धाचा पुकारा केलेला आहे. रणाविण स्वातंत्र्य कधी मिळतच नसते.
रिबेलो यांनी टीसीपी कायद्यातील कलमांवर बोट ठेवले आहे. कलम १६ बी, १७-२, ३९ रद्द करावीत, अशा कलमांचा कायदाच रद्द करावा, अशी मागणी रिबेलो यांच्या नेतृत्वाखालील चळवळीने केली आहे. शेतजमिनींचे घाऊक रूपांतरण करण्यास भूमिपुत्रांचा विरोध आहे हे सरकारने लक्षात घ्यावे.
सीआरझेडमध्ये एरवी साध्या मच्छीमाराने झोपडी उभी केली तर ती मोडली जाते, पण नाईट क्लब, मोठी हॉटेल्स उभी राहतात. ही सगळी बांधकामे सील करा ही मागणी योग्यच आहे. फर्दिन रिबेलो यांच्या सभेला मंगळवारी मिळालेला मोठा प्रतिसाद ही युद्धाचीच नांदी आहे.