निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:40 IST2025-09-29T13:39:59+5:302025-09-29T13:40:47+5:30
साखळी मतदारसंघात युवा उत्सवानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन

निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : समाजाला निरोगी ठेवणे हे आज आमच्यासमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा व निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घडवून जागृती करावी. स्वतः फिट राहून समाज निरोगी ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पाळी येथे साखळी मतदारसंघातील युवा वर्गातर्फे आयोजित केलेल्या साखळी युवा उत्सव २०२५ अंतर्गत पुढील काही दिवस विविध क्रीडा, सांस्कृतिक पातळीवर स्पर्धा होणार आहेत. या अंतर्गत युवा रन ही मॅरेथॉन साखळी मतदारसंघातील युवावर्गासाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन पाळी येथील बॉम्बे रोड जंक्शनवर मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, गोवा भाजप युवा अध्यक्ष तुषार केळकर, साखळी मंडळ अध्यक्ष रामा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, मंडळाचे सरचिटणीस संजय नाईक, कालिदास गावस, पाळीचे सरपंच संतोष नाईक, आमोणाचे सरपंच सागर फडते, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, सुर्लच्या सरपंच साहिमा गावडे, वेळगेच्या सरपंच सपना पार्सेकर, हरवळेच्या सरपंच गौरवी नाईक, साखळीचे उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते मशाल पेटवून तसेच बावटा दाखवून उदघाटन करण्यात आले.
'आरोग्य हीच खरी संपत्ती'
आरोग्य हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती राखून ठेवण्यासाठी सरकार तसेच विविध एनजीओ अनेक उपक्रम राबवतात. मॅरेथॉन स्पर्धाही याच उपक्रमांपैकी एक असून या स्पर्धेमध्ये आजकाल मोठ्या संख्येने युवांबरोबरच ज्येष्ठ व मध्यमवयीन लोक सहभागी होतात. ही चांगली गोष्ट आहे. याचवरून प्रत्येक स्पर्धक आपल्या तंदुरूस्तीची खात्री करून घेत आहेत, ही चांगली बाब आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
'रोज अर्धा तास व्यायाम करा'
साखळी मतदारसंघातील सुमारे ५०० स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता. मुख्यमंत्री म्हणाले, की आजच्या व्यस्त व धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लोकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आजच्या काळात वृद्धांसह कमी वयातील युवांनाही विविध प्रकारचे आजार जडत आहेत. त्यामुळे युवकांनी आपल्या दैनंदिन कामांबरोबरच दररोज अर्धा तास व्यायाम व योग यासाठी द्यावा.