लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुन्हे शाखेच्या कोठडीतून पाळालेला अट्टल गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान हा भोळेपणाचे सोंग घेणारे व्हिडीओ व्हायरल करीत असला तरी हा सुलेमान सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर देशभर १५ गुन्हे नोंद असून जमिनी बळकावण्यात तो तरबेज आहे.
सुलेमानवर म्हापसा पोलिस स्थानकात नोंदविण्यात आलेला भू- बळाकाव प्रकरणातील गुन्हा हा पहिलाच नव्हे. त्याच्यावर दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि इतर शहरातही गुन्हे नोंद आहेत. इंटरनेटवर गुगल सर्च केले असता त्याच्यावर नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांची यादीच सापडते. मात्र सर्वाधिक गुन्हे त्याच्याविरुद्ध गोव्यात नोंद झाले आहेत. त्यानंतर हैदबादमध्ये नोंद आहेत. गोव्यात नोंद केलेल्या गुन्ह्यात जमिनी हडप करण्याबरोबर खुनाचा गुन्हाही नोंद आहेत.
अमितच्या जिवाला धोका
कोठडीतून बाहेर काढून आपल्याला १२ पोलिसांनी कर्नाटकात सोडल्याचा खळबळजनक व्हिडीओ सुलेमान याने जारी केल्यानंतर सुलेमान तसेच आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक या दोघांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी म्हटले आहे. सुलेमान कोठडीतून पळण्याच्या तीन दिवस आधी आम्ही रायबंदरच्या क्राइम ब्रँच आवारातील खास करून अधीक्षक कार्यालय जे विरुद्ध दिशेला आहे, तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जारी करा, अशी मागणी गेली होती. परंतु ती फेटाळ्यात आली. या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे नवीन पथक नेमावे. १२ डिसेंबर २०२४ रोजीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ प्रसिद्ध करावे. तसेच अमित नाईक यांच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी द्यावी, असेही पालेकर म्हणाले.
अमित इस्पितळातच
महाघोटाळेबाज सुलेमानला गुन्हे शाखेच्या कोठडीतून कर्नाटकात नेऊन सोडणारा बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक अद्याप गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहे. जुने गोवे पोलिसांच्या कोठडीत असताना अमितने रविवारी फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असून उद्या, बुधवारी त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
विषारी इंजेक्शन...
सुलेमानला ओळखणारी माणसे त्याच्याविषयी ज्या गोष्टी सांगतात त्या थरकाप उडविणाऱ्या आहेत. त्यात ते विषारी इंजेक्शनबद्दलही सांगतात. म्हापसा येथील एका वकीलवर त्याने विषारी इंजेक्शचा प्रयोग केल्याचे लोक सांगतात. या इंजेक्शनमुळे माणूस बराच वेळ विचार करण्याची शक्ती हरवून बसतो. कागदपत्रांवर कुणाची स्वाक्षरी घ्यायची असल्यास सुलेमान या इंजेक्श्नचा प्रयोग करीत असल्याचे आरोप आहेत. हणजूण येथील खून प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
सुलेमानला पकडण्यास प्राधान्य : डीजीपी
सुलेमान खान याच्या सर्व आरोपांची चौकशी त्याला पकडल्यावरच करणे शक्य होणार आहे. सुलेमान गुन्हेगार असून त्याने केलेल्या आरोपांवर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे त्याला पकडणे हेच आमचे प्राधान्य आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली आहे. गुन्हे शाखेच्या कोठडीतून कॉन्स्टेबलच्या मदतीने पळून गेलेला महाघोटाळेबाज सुलेमान खान याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. आपण तुरुंगातून पळून जाण्यास पोलिस अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप त्याने केला आहे. या आरोपासंबंधात पोलिस महासंचालकांनी वरील स्पष्टीकरण दिले. सुलेमान सराईत गुन्हेगार आहे. तो कोणता तरी अजेंडा ठेवून बोलत आहे. पोलिसांचा तपास भरकटविण्याचा त्याचा डाव आहे, त्यामुळे हे सारे आरोप तो करीत आहे. त्याच्या आरोपाची जरी चौकशी करायची असेल तरीही त्याला पकडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
महिलांच्या नावे बँक खाती
एखादा सराईत गुन्हेगार जसा कपटनीती करतो नेमक्या त्याचप्रमाणे सुलेमानचेही कारनामे आहेत. त्याने अनेक महिलांच्या नावे बँक खाती उघडल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. अशा ३५ महिलांना त्यांनी असे करून गुन्हेगारीत ओढल्याचेही आढळून आले आहे. महिलांच्या खात्यातील पैसे तोच काढत होता, असेही आढळून आले आहे.
कवठणकरांना समन्स
सुलेमानच्या व्हिडीओच्या संदर्भात चौकशीसाठी काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. हा व्हिडीओ त्यांना कुठे मिळाला? याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले. आज सकाळी १० वाजता त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.