वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:40 IST2025-10-12T09:40:09+5:302025-10-12T09:40:49+5:30
दोन ते तीन तास वादळी वारा : रेडे घाटीसह अन्य रस्त्यांवर वाहतूक खोळंबली

वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वाळपई परिसरात शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुरुवातीला सोसाट्याचा वारा, विजांचा चमचमाट, ढगांच्या गडगडाटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वाळपई आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे दुचाकीचालकांची तसेच लहान चारचाकी वाहनचालकांनी मोठी गैरसोय झाली. सव्वा पाच नंतर पावसाचा जोर कमी झाला व पाणी ओसरले. वादळी वाऱ्यामुळे सुमारे ५० झाडे पडली.
नाणूस, रेडे घाटी, भुईपाल, अडवई, वाघुरे, भिरोंडा, पाडेलीपर्यंत मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. वाळपई-होंडा मार्गावर दहाहून अधिक झाडे पडली होती. ठाणे, पाली येथे विटांच्या भट्टीजवळ आंब्याचे झाड पडले होते. वाळपई अग्निशामक दलाला ठाणे येथून पहिला कॉल आला होता.
होंडा-वाळपई मुख्य रस्त्यावर रेडे घाटी येथे सगळ्यात जास्त झाडे पडल्याने वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती. स्थानिक लोकांसह दुचाकीचालकांनी काही झाडाच्या फांद्या ओढून, तोडून दुचाकी जाण्यासाठी रस्ता काहीसा मोकळा करून दिला. अचानक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहर सोडून ग्रामीण भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते.
शाळेचे छत उडाले
वादळी वाऱ्यामुळे ठाणे-सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे छत उडाल्याची घटना घडली. रस्त्यावर पडलेली झाडांची संख्या मोठी असल्याने ती हटविण्यासाठी व रस्ता खुला करण्यासाठी अग्निशामक दलाला किमान दहा वाजण्याची शक्यता होती. त्यामुळे होंडाच्या बाजूने एक जेसीबी बोलवून रस्त्यावर पडलेली झाडे दूर केली. सायंकाळी ७नंतर झाडे बाजूला करून रस्ता खुला करण्यात आला.
तीन तास वाहतूक कोंडी
अग्निशामक दलाला अचानक एकाच वेळी अनेक कॉल आल्यामुळे त्यांचे जवान विविध ठिकाणी व्यस्त राहिले. त्यामुळे होंडा-वाळपई रस्ता खुला करण्यासाठी उशीर होऊ लागला. तीन तास रस्ता बंद राहिल्याने वाहनचालकांचे तारांबळ उडाली. प्रवासी बसेस रेडे घाटी येथे अडकून पडल्या होत्या.
संध्याकाळी शाळा, कॉलेजमधून घरी जाणारे विद्यार्थीही वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. बसेस उशीर झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांचेही हाल झाले. वाळपई-फोंडा रस्त्यावरील नाणूस येथे पडलेले झाड हटवून हा रस्ता सर्वप्रथम खुला करण्यात आला. रात्री उशिरा भिरौंडा-अडवई रस्ता खुला करण्यात अग्निशामक दलाला यश आले.