अरबी समुद्रात वादळ

By Admin | Updated: June 12, 2014 01:28 IST2014-06-12T01:15:49+5:302014-06-12T01:28:21+5:30

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्ट्याचे वादळी वाऱ्यात रूपांतर झाले असून ‘नानौक’ वादळ ७२ तासांत ओमान किनाऱ्याला

Storm in the Arabian Sea | अरबी समुद्रात वादळ

अरबी समुद्रात वादळ

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्ट्याचे वादळी वाऱ्यात रूपांतर झाले असून ‘नानौक’ वादळ ७२ तासांत ओमान किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. समुद्रात गोव्यापासून जवळच या वादळाची निर्मिती होणार असली, तरी सद्यस्थितीत गोवा किंवा कोकण किनाऱ्याला धोका नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गोव्यात मान्सून दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा वेधशाळेने केली आहे.
येथील हवामान वेधशाळेच्या हंगामी संचालक व्ही. के. मिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.३0 वाजता अरबी समुद्रात पूर्व-मध्य भागात कमी दाबाचा मोठा पट्टा निर्माण होऊन पहाटे ५.३0 वाजता त्याचे ‘नानौक’ वादळात रूपांतर झाले. हे वादळ मुंबईपासून समुद्रात ६६0 कि. मी. अंतरावर नैर्ऋत्येकडे सरकले आहे. गुजरातमधील वेरावल किनाऱ्यापासून ५९0 कि. मी. सागरी अंतरात पुढे सरकले आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन समुद्रात पुढे सरकत ७२ तासांत ओमान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.
गोव्यात बुधवारी मान्सून दाखल झाल्याचे हवामान वेधशाळेने अधिकृतपणे जाहीर केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात मान्सूनला विलंब झाला होता. आगामी २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Storm in the Arabian Sea