ड्रग्ज 'आरोपयुद्ध' थांबविणे आव्हान; भाजपसाठी आजी-माजी आमदारांमधील वाद डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:25 IST2025-07-06T13:24:48+5:302025-07-06T13:25:37+5:30

पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम

stopping the drug accusations war is a challenge dispute between current and former mla is a headache for bjp | ड्रग्ज 'आरोपयुद्ध' थांबविणे आव्हान; भाजपसाठी आजी-माजी आमदारांमधील वाद डोकेदुखी

ड्रग्ज 'आरोपयुद्ध' थांबविणे आव्हान; भाजपसाठी आजी-माजी आमदारांमधील वाद डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ड्रग्जच्या मुद्यावरून पेडणेच्या आजी-माजी भाजप आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सुरू झालेले युद्ध आता आणखी पेटले आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी भाजपच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आमदार गोविंद गावडे विरुद्ध सभापती तवडकर यांच्यातील द्वंद्वानंतर आता आर्लेकर विरुद्ध आजगावकर वाद वाढण्याची शक्यता आहे.

शिस्तीचा पक्ष, असे भाजप नेते प्रत्येक सभेतून उल्लेख करतात. त्याच भाजपमधील धुसफूस आता अंतर्गत बाब राहिली नसून ती आता चव्हाट्यावर आली आहे. प्रवीण आर्लेकर यांचा ड्रग्जशी संबंध जोडून आजगावकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दखल घेऊन ते शांत केले, असे वाटत असतानाच आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या समर्थकांनी आजगावकर यांची प्रतिमा दहन केल्यामुळे पुन्हा एकदा हा वाद भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुणीही माघार घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. त्यातच आजगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत आपण पेडणेतून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने भाजपच्या गोटातच खळबळ माजली आहे. अलीकडे भाजपमध्ये वेळोवेळी आमदारांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गोविंद गावडे विरुद्ध रमेश तवडकर यांच्यामध्ये अधूनमधून फैरी झडतच असतात. त्यात आता पेडण्यातील आजी-माजी आमदारांची भर पडल्यामुळे भाजप नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

दोघांशीही चर्चा करू : दामू

आर्लेकर-आजगावकर यांच्या वादाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता, त्यांनी आर्लेकर आणि आजगावकर यांच्यात काही वाद असल्यास ते लवकर संपतील, असे सांगितले. पक्ष योग्य माध्यमातून दोघांशीही चर्चा करील, असेही ते म्हणाले.

 

Web Title: stopping the drug accusations war is a challenge dispute between current and former mla is a headache for bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.