"सर्वाधिकार शिंदेंना, मंत्रिपदे आणि इतर गोष्टी शिंदेच ठरवतील", दीपक केसरकर यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:45 IST2022-06-30T14:44:51+5:302022-06-30T14:45:29+5:30
Deepak Kesarkar: बंडखोर गटाकडे मंत्रिपदे किती यावीत, मुख्यमंत्री कोण असावा याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

"सर्वाधिकार शिंदेंना, मंत्रिपदे आणि इतर गोष्टी शिंदेच ठरवतील", दीपक केसरकर यांचं मोठं विधान
पणजी : बंडखोर गटाकडे मंत्रिपदे किती यावीत, मुख्यमंत्री कोण असावा याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर प्रथमच बंडखोर गटाच्या वतीने केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. ते म्हणाले की, ‘अमुक आमदारांना मंत्रिपदे दिली जातील, अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून येत आहेत परंतु मंत्रिपदांबाबत अजून काहीच ठरलेले नाही. शिंदे मुंबईला गेले आहेत ते मंत्रिपदे मागण्यासाठी नव्हेत तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिने काय करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी होय. शिंंदे हे मुंबईत भाजप नेत्यांशी बोलतील. त्यांना आम्हा आमदारांच्या वतीने सर्व अधिकार दिलेले आहेत.’ मंत्रीपदे कोणाला मिळणार व कोणाला डावलणार याबाबत वावड्या उठवून काही विरोधक आमच्यात फूट घालू पहात आहेत, असे केसरकर म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले की, भाजपसोबत जाण्यावर आम्ही ठाम आहोत. समविचारी पक्ष म्हणून भाजपसोबत जात आहोत. परंतु त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम राहील.
महाराष्ट्रातील जनतेने सेना-भाजप युतीला कौल दिला होता. ही नैसर्गिक युती तोडण्यात आली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली. त्याला आमचा विरोध होता, असे म्हणत केसरकर यांनी सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांनी गेल्या सात दिवसात बंडखोर आमदारांना जो त्रास दिला तो पाहता गेल्या अडीच वर्षात भाजपला त्यांनी किती छळले असावे याची कल्पना येते, असे केसरकर म्हणाले. राऊत यांनीच सेनेच्या आमदारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करुन उलट ‘चोर कोतवाल को डाटे’, असा प्रकार राऊत करताहेत, अशी टीका केसरकर यांनी केली.
केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली असती तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार होतो परंतु अखेरपर्यंत त्यांचे आडमुठे धोरण राहिले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला म्हणून आम्ही सलेब्रेशन वगैरे केले नाही. ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे.’