भाजपकडूनच नेतृत्व बदलाच्या अफवा; काँग्रेस नेते अमित पाटकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:00 IST2025-10-03T12:59:37+5:302025-10-03T13:00:10+5:30
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'सोबत युती करणार का?

भाजपकडूनच नेतृत्व बदलाच्या अफवा; काँग्रेस नेते अमित पाटकर यांची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेस प्रदेश नेतृत्त्वात बदल केला जाणार असल्याच्या अफवा भाजपकडूनच पसरवल्या जात आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
पत्रकारांच्या प्रश्नावर पाटकर म्हणाले, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात हुकूमशाही किंवा 'वरुन' फतवा पाठवण्याची पद्धत नाही. नेतृत्त्वबदलाच्या अफवा भाजपच पसरवत आहे. अशा कंड्या पिकवण्यात ते तरबेज आहे. लोकांनी या अफवांना बळी पडू नये.' आम आदमी पक्षाने लोकांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण करु नये, असे आवाहन करताना पाटकर म्हणाले की, 'चाळीसही मतदारसंघात काम सुरु केल्यावर मला लक्ष्य करण्यात आले. पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशानेच मी गटस्तरावर संघटन मजबूत करण्याच्या कामी लागलो होतो. परंतु 'आप'ने माझ्यावर टीका सुरु केली.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'सोबत युती करणार का? या प्रश्नावर पाटकर म्हणाले की, युतीबाबतचा निर्णय निवडणुकी वेळीच होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना युती हवी होती म्हणून केली. नंतर बाणावली जि. पं. पोटनिवडणुकीतही आप उमेदवाराला समर्थन देऊन आम्ही युतीचा धर्म पाळला. आम्हा सर्व विरोधी पक्षांचा लढा भाजपशी आहे. आप कोणती भूमिका घेतोय, काय बोलतोय हे गोव्यातील जनता पहात आहे.'
काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना पाटकर म्हणाले की, भाजपच्या ओठांवर महात्मा गांधी आणि हृदयात मात्र नथुराम गोडसे आहेत.' भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी एक्स वरुन पाटकर यांच्यावर टीका करताना स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हताश होऊन हे विधान केल्याचे म्हटले आहे. शंभर वर्षे निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या लाखो स्वयंसेवकांचा अपमान आहे.
विधानावरुन वाद
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल गांधी जयंतीदिनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. या विधानाबद्दल पाटकर यानी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.