पांडुरंग मडकईकरांच्या आरोपांचे पडसाद वाढता वाढता वाढे; मंत्र्यांची मात्र बचावात्मक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:17 IST2025-03-07T12:16:23+5:302025-03-07T12:17:06+5:30
काँग्रेसचे राज्यपालांना पत्र

पांडुरंग मडकईकरांच्या आरोपांचे पडसाद वाढता वाढता वाढे; मंत्र्यांची मात्र बचावात्मक भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांचे पडसाद वाढतच चालले आहेत. काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली तर काही जागरुक नागरिकांनी एसीबीकडे तक्रार केली. मंत्र्यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, मी मडकईकर यांची प्रत्यक्ष भेट घेणार असून याबाबतीत त्यांच्याशी बोलणार आहे व त्यानंतरच भाष्य करीन.'
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, 'अशा प्रकारचे आरोप कोणीही करू शकतो. परंतु पुराव्यांशिवाय आरोप करणे निरर्थक आहे.' कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले की,' मडकईकर हे माझ्यासाठी थोरल्या बंधूसारखे आहेत त्यामुळे या आरोपांबाबत मी भाष्य करु इच्छित नाही.'
आरोप करताना स्पष्ट बोला
मडकईकर यांच्याकडे पैसे मंत्र्यानेच मागितले की अन्य कोणी हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. ते म्हणाले कि, मडकईकर हे माझे आजकालचे नव्हेत तर गेल्या २०-२५ वर्षांपासूनच मित्र आहेत. आरोप करताना त्यांनी स्पष्ट बोलायला हवे होते. लोकांचा गैरसमज होईल, असे बोलू नये.'
मडकईकरांनी नाव घ्यावे
उत्पल पर्रीकर म्हणाले कि, बाबुश यानी पैसे घेणारा मंत्री की पीए? असा जो प्रश्न केला आहे. त्यावरुन संशय बळावतो. मडकईकर यांनी मंत्र्याचे नाव उघड करुन पुरावेही सादर करायला हवेत. हा मंत्री पणजीचाच असावा असा मला संशय आहे. या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशावरुन पीएला दूर केले होते. परंतु आता पुन्हा हे प्रकार सुरु झाले असावेत.
नाव न घेता आरोप आता का केले?
माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेले आरोप आता का केले? मंत्र्यांवर आरोप करण्यासारखी परिस्थिती का उद्भवली? असे प्रश्न आता जनतेकडून उपस्थित होत आहे. मात्र, त्यांनी केलेल्या आरोपांमुळे नेमकी वस्तुस्थिती काय? त्यांनी नाव न घेता आरोप कशासाठी केले, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.