भाजपच्या पराभवासाठी युतीस तयार; विरोधकांनी एकत्र येण्याचे आम आदमी पक्षाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 07:57 IST2026-01-13T07:55:50+5:302026-01-13T07:57:23+5:30
जागा वाटप नव्हे तर ध्येय धोरणे महत्त्वाची: वाल्मिकी नायक

भाजपच्या पराभवासाठी युतीस तयार; विरोधकांनी एकत्र येण्याचे आम आदमी पक्षाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही युती करण्यास तयार आहे. मात्र युतीत जागा वाटप नव्हे तर त्याचे ध्येय धोरणे महत्वाची आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढे यावे असे आवाहन आमआदमी (आप) पक्षाचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांनी केले आहे.
यावेळी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव प्रशांत नाईक, कार्यकारी अध्यक्ष गर्सेन गोम्स, आमदार क्रुझ सिल्वा, कॅप्टन वेंझी व्हिएगस व वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर उपस्थित होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर पुढील पाच वर्ष जनतेला काय देणार हे अगोदर युती मध्ये ठरणे आवश्यक आहे. त्यामुळे युती म्हणजे केवळ जागा वाटप नव्हे तर त्याची ध्येय धोरणे महत्वाची आहेत. त्यामुळे त्यावर अगोदर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नायक म्हणाले, की जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश लाभले नाही. आमचा पक्ष हा सत्तेसाठी आला नसून तो आंदोलनातून तयार झालेला पक्ष आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेला आम्ही पर्याय, चांगले उमेदवार देत आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी चांगला व स्वच्छ चेहरा दिला आहे. त्यामुळेच दिल्ली व पंजाब येथे आम्हाला यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात भाजपचा पराभव करण्यासाठी हा आमचा लढा आहे. त्यासाठी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करण्यास तयार आहे. मात्र युतीत जागा वाटप नव्हे तर त्याचे ध्येय धोरणे म्हणजेच अजेंडा महत्वाचा आहे.
अजेंडा स्पष्ट करण्यापूर्वी अगोदर चर्चा करण्याची गरज आहे. आरजी पक्ष, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षांकडे बरेच मुद्दे आहेत. कारण जागा वाटपाचा विषय हा त्यानंतर येतो. त्याअनुषंगाने या ध्येय धोरणावर चर्चा करण्यासाठी पुढे यावे असेही नायक यांनी आवाहन केले.
तत्त्वांशी तडजोड करणार नाही
भाजपचा पराभव करण्यासाठी 'आप'ने यापूर्वीच त्याग केला आहे, पण आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही. लोकसभा निवडणुकीवेळी आमची भूमिका आधीच सिद्ध केली आहे. दक्षिण गोव्यासाठी माझे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले होते, परंतु भाजपचा पराभव करण्याचे ध्येय समोर ठेवून मी माझी उमेदवारी मागे घेतली. यातून आमचा हेतू स्पष्ट होतो असे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केले.