रवी नाईक यांनी विचारांचा वारसा निर्माण केला: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:33 IST2025-10-20T12:32:47+5:302025-10-20T12:33:25+5:30
कला अकादमीमध्ये आयोजित शोकसभेत नाईक यांच्या खिलाडूवृत्तीसह अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा गौरव

रवी नाईक यांनी विचारांचा वारसा निर्माण केला: देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: रवी नाईक यांच्या निधनानेराजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. राजकारणात शत्रू निर्माण न करता हसत-खेळत, खिलाडूवृत्तीने राजकारण कसे करायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नाईक यांनी आपल्या मागे मोठा वारसा ठेवला आहे. हा वारसा जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रविवारी पणजीतील कला अकादमीमध्ये राज्य सरकारच्यावतीने स्व. मंत्री रवी नाईक यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ब्रह्मेशानंद स्वामी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांसह आजी-माजी मंत्री, आमदार, नागरिकांची उपस्थिती होती. भविष्यात जेव्हा जेव्हा कूळ-मुंडकारांचा विषय येईल, तेव्हा लोक रवींची आठवण काढतील, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'नाईक यांचा वारसा कायम स्मरणात राहील. गृहमंत्री म्हणून त्यांचे नेतृत्व कणखर होते. कृषिमंत्री म्हणून त्यांची संवेदनशीलता जनता नेहमीच लक्षात ठेवेल. त्यांनी उभारलेला वारसा काळाच्या कसोटीवर उतरेल.'
फडणवीस म्हणाले की, 'रवी नाईक यांची आणि माझी ओळख २०२१ मध्ये पक्ष प्रवेशावेळी झाली. नाईक यांचा राजकारणातील दीर्घ अनुभव त्यावेळी आमच्या कामी आला. ते उत्तम राजकारणी व समाजकारणी होते. दर्जेदार व्हॉलिबॉलपटूदेखील होते. क्रीडाक्षेत्रातील खिलाडूवृत्ती घेऊनच ते राजकारणात आले. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी अनेक मोठी पदे भूषविली. काही वेळा त्यांचा निवडणुकीत पराभव झाला; पण या प्रवासात त्यांनी आपला स्वभाव कधीच बदलला नाही. उलट समाजातील दाबलेल्या लोकांचा किंवा ज्यांचा कोणीच आवाज नव्हता, अशा लोकांचा ते आवाज बनले. म्हणूनच नाईक बहुजनांचे नेते झाले.'
रवी कूळ-मुंडकार विषयातील तज्ज्ञ : सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अंत्ययात्रेला झालेली तुफान गर्दी मी केवळ ऐकून होतो, कारण त्यांच्या निधनानंतरचा माझा जन्म झाला. मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेला लोकांनी केलेली गर्दी मी पाहिली होती. त्यानंतर केवळ नाईक यांच्या अंत्ययात्रेला तशी गर्दी झाली. ते बहुजन समाजाचे कैवारी असले तरी इतर समाजातील लोकांमध्ये त्यांचे खूप चाहते होते. कूळ- मुंडकार विषयात तर ते तज्ज्ञच होते. विधानसभेत मला जेव्हा विरोधी आमदार या विषयावरील प्रश्न विचारायचे, तेव्हा ते स्वतःहून उभे राहून त्यांच्या शंकांचे निवारण करायचे. सर्वसामान्य लोकांना कूळ-मुंडकार कायद्याच्या माध्यमातून फायदा व्हावा, हेच त्यांचे ध्येय होते. त्यांच्याच कारकिर्दीत फोंड्याचा प्रचंड विकास होऊ शकला. भंडारी समाजाला एकत्रित आणण्याचे काम त्यांनी केले. नाईक हे युवकांसाठी प्रेरणास्रोत आणि आमच्यासाठी योग्य मार्गदर्शक होते. त्यांची आठवण सदैव आमच्या मनात राहील.
मंत्री राणे झाले भावूक..
नाईक यांच्याबद्दल बोलताना मंत्री विश्वजीत राणे भावूक झाले. त्यांना गहिवरुन आले. राणे यांनी सांगितले की, नाईक हे सर्वतोपरी मदत करायचे. माझे वडील प्रतापसिंग राणे हे केवळ नाईक यांच्यामुळे अजून हयात आहेत. ३५ वर्षांपूर्वी, जेव्हा माझ्या वडिलांना हदयविकाराचा झटका आलेला तेव्हा त्यांनी विमानातून बाहेरुन डॉक्टर तातडीने आणत त्यांचा जीव वाचवला. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही.
मान्यवरांची उपस्थिती
शोकसभेला मंत्री विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, दिगंबर कामत, माविन गुदिन्हो, आमदार प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, दिव्या राणे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, नरेंद्र सावईकर, उद्योजक अवधूत तिंबले, प्रतिमा धोंड, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, सिद्धेश नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.