अमित पाटकर यांच्यावर युतीसाठी दबाव; आरजीला सोबत घेण्यावर काँग्रेसचे तिन्ही आमदार ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:15 IST2025-12-05T13:14:34+5:302025-12-05T13:15:30+5:30
काँग्रेसचे तिन्ही आमदार आरजीसोबत युती करण्याबाबत ठाम आहेत.

अमित पाटकर यांच्यावर युतीसाठी दबाव; आरजीला सोबत घेण्यावर काँग्रेसचे तिन्ही आमदार ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जि. पं. निवडणुकीसाठी भाजपविरोधात गोवा फॉरवर्ड व आरजीसोबत आघाडी स्थापन करण्यासाठी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर मोठा दबाव आहे. काँग्रेसचे तिन्ही आमदार आरजीसोबत युती करण्याबाबत ठाम आहेत.
काल मंगळवारी आरजीने आपले १२ उमेदवार जाहीर केल्यानंतर आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परंतु प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना आरजीला वगैरे सोबत घेऊन आघाडी स्थापन करण्याबाबत अजूनही मी आशावादी आहे, असे सांगितले.
ते म्हणाले की, 'या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेश निवडणूक समितीची बैठक बोलावली आहे. अ. भा. काँग्रेस समितीच्या आमच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही संपर्कात आहोत. युतीबाबत ही समितीच काय तो अंतिम निर्णय घेईल.'
पाटकर म्हणाले की, 'गोव्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच आम्हाला विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे वाटते. अ. भा. काँग्रेस समितीचे प्रभारी आज शुक्रवारी गोव्यात येत असून तेच काय तो अंतिम निर्णय घेतील.
यादीस कांग्रेसच्या पहिल्या आरजीने आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल विचारले असता पाटकर म्हणाले की, 'मित्रपक्षांसोबत चर्चेत जे मतदारसंघ नव्हते त्याच मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार घोषित केलेले आहेत. उमेदवार जाहीर करण्यास विलंब होतोय याचे कारण विरोधक एकत्र यावेत यासाठी शेवटपर्यंत आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण गोव्यातून माझ्यावर दबाव येतोय. उमेदवारांना फिल्डवर उतरुन प्रचारासाठी अवधी मिळायला हवा. माझ्यावर एवढा दबाव आहे की रात्री झोपही घेता येत नाही.'
सांताक्रुझची जागा काँग्रेसनेच लढवावी : जॉन नाझारेथ
दरम्यान, डिसेंबर २०२० च्या जि. पं. निवडणुकीत सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसच्या शायनी ऑलिवेरा विजयी ठरल्या होत्या. मात्र आरजीने या जागेवरही आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे सांताक्रुझ गटाध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी पत्रकारांशी बोलताना ही जागा काँग्रेसने इतरांना न देता स्वतःच लढवायला हवी, असे म्हटले आहे.
काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी विरोधकांची आघाडी हवीच : एल्टन
आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, 'विरोधी पक्षांची आघाडी करुनच निवडणूक लढवावी अशी माझी ठाम भूमिका आहे. राज्यातील जनतेची हीच भावना आहे. त्यासाठी पक्षाला काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी तो करावा.' काँग्रेसकडून आघाडीबाबत निर्णय घ्यायला किंवा उमेदवार जाहीर करायला विलंब का होत आहे?, असे विचारले असता ते तुम्ही प्रदेशाध्यक्षांना जाऊन विचारा, असा नाराजीचा सूर व्यक्त केला.
ते म्हणाले की, गोव्यातील वाढती गुन्हेगारी तसेच मोरजीसारख्या ठिकाणी परप्रांतीयांकडून स्थानिकांना झालेली मारहाण वगैरे पाहता नीज गोंयकारांच्या हितासाठी विरोधकांची युती व्हायलाच हवी, असे माझे स्पष्ट म्हणणे आहे.'
आरजी आक्रमक
काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने आरजी आक्रमक बनला होता. पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेसवर आगपाखड करीत ही निव्वळ फसवणूक व षयंत्र असल्याचा आरोप केला होता. आघाडीत सहभागी व्हावे की नाही, हे ठरवण्यासाठी गुरुवारी रात्री पक्षाची कोअर कमिटी व निवडणूक समितीची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळी १२ उमेदवार जाहीर २ करण्यात आले. कळंगुट, रेइश मागुश, कुडतरी, चिंबलमध्ये आरजीची व्होट बँक असल्याचा व तेथे आरजी मजबूत असल्याचा दावा मनोज करीत असले तरी या मतदारसंघात त्यांनी अजून उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
आरजीकडून १२ उमेदवार जाहीर
गुरुवारी आरजीने आपले १२ उमेदवार जाहीर केले. शिरोडा मतदारसंघात गोवा फॉरवर्डने आपल्या उमेदवाराचा प्रचार आधीच सुरू केला आहे. मात्र, आरजीने तेथे दीपनीती शिरोडकर यांना उमेदवारी जाहीर केली. आरजीने उत्तर गोव्यात ७, तर दक्षिण गोव्यात ५ उमेदवार जाहीर केले.
भाजपचे दोन उमेदवार जाहीर
भाजपने आणखी दोन उमेदवार जाहीर केले असून, दवर्ली मतदारसंघात सत्यविजय नागेश नाईक (ओबीसी राखीव) व नावेली मतदारसंघात लक्ष्मी बाबुराव शेटकर (ओबीसी महिला) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आतापर्यंत एकूण ४० उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित दहा जागांपैकी ३ जागा मगोपला दिल्या आहेत, तर ७ जागांवर भाजप अपक्षांना पाठिंबा देणार आहे.