केरीतील गर्भवतीचा खून

By Admin | Updated: June 6, 2014 01:55 IST2014-06-06T01:54:25+5:302014-06-06T01:55:59+5:30

वाळपई : धनगरवाडा, केरी येथील भाग्यश्री ऊर्फ गुलाबी जानू झोरे हिचा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याची शक्यता आहे.

Pregnant blood in Kerry | केरीतील गर्भवतीचा खून

केरीतील गर्भवतीचा खून

वाळपई : धनगरवाडा, केरी येथील भाग्यश्री ऊर्फ गुलाबी जानू झोरे हिचा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याची शक्यता आहे. भाग्यश्रीचा पती संशयित जानू झोरे यास वाळपई पोलिसांनी गजाआड केले आहे. भाग्यश्री हिचा बुधवारी सायंकाळी ६ वाजता तिच्याच घरात कोयत्याने वार करून खून झाला होता. तो अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
शवचिकित्सेनंतर तिचा मृत्यू धारदार कोयत्याने वार केल्यानेच झाल्याचे व ती गरोदर असल्याचे अहवालात म्हटले आहे. भाग्यश्री ही साखळी येथे घरकामाला होती. ती सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असे. बुधवारीदेखील ती सायंकाळी ५.३०च्या दरम्यान घरी आली होती. तिचे व पती जानू यांचे पटत नव्हते. त्यामुळे दररोज दोघांची भांडणे होत. जानू तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांत भांडणे होत होती. तिच्या दिराचे आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्यानिमित्ताने मंगळवारी त्याच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी भाग्यश्री व जानू यांचे जोरदार भांडण झाले होते. बुधवारी सायंकाळी भाग्यश्री घरी आल्यानंतर भांडणाची पुनरावृत्ती झाली. दोघांचे जोरदार भांडण झाले आणि अचानक जोरात आवाज आला. तो आवाज ऐकू आल्यानंतर जानूची बहीण तिथे धावून गेली. तिला भाग्यश्री रक्ताच्या थारोळ््यात खाली पडल्याचे दिसले. तिने १०८ रुग्णवाहिकेला बोलविले असता तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक दिनराज गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी घटनेचा पंचनामा केला. संशयिताने अजूनही खुनाची कबुली दिलेली नाही. गुरुवारी त्याला डिचोली न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. भाग्यश्री हिला साईश हा तीन वर्षांचा मुलगा आहे. भाग्यश्री व जानू यांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात पटत नव्हते. यापूर्वी केरी आउटपोस्टवरही तक्रारी दाखल झाल्या होत्या. बुधवारी ही घटना घडल्यानंतर जानू यानेच केरी आउटपोस्टवर जाऊन ही माहिती पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Pregnant blood in Kerry