पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:41 IST2025-11-15T09:41:02+5:302025-11-15T09:41:50+5:30
सरकारी नोकरी विक्रीप्रकरणी मुख्य संशयित पूजा नाईक हिने मोठा गौप्यस्फोट केला.

पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी नोकरी विक्रीप्रकरणी मुख्य संशयित पूजा नाईक हिने शुक्रवारी मोठा गौप्यस्फोट केला. मगो पक्षाच्या कार्यालयात कामाला असताना एका मंत्र्यानेच आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी ओळख करून देत याबाबतचा व्यवहार त्यांच्याशी करावा, असे सांगितले होते, असा आरोप केला आहे.
पूजा हिने सांगितले की, '२०१९ ते २०२२ या काळात मी या तिघांच्या संपर्कात होते. ६१३ अर्जासाठी सुमारे १७.६८ कोटी रुपये त्यांना दिले होते. मात्र, त्यापैकी एकाही उमेदवाराला सरकारी नोकरी मिळाली नाही. आपल्याला आपले पैसे परत मिळावे ही मागणी आहे', असे तिने सांगितले.
पूजा नाईक म्हणाली, 'मी मगो पक्षाच्या कार्यालयात कामाला होते. त्यावेळी मी आपल्या काही नातेवाईक तसेच ओळखीच्या लोकांची सरकारी नोकरीची कामे केली होती. ज्यावेळी विविध सरकारी खात्यांमध्ये मेगा नोकरभरती सुरू झाली, तेव्हा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्याला सरकारी नोकऱ्यांबाबत थेट आयएएस अधिकारी निखिल देसाई, पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अधिकारी उत्तम पार्सेकर यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी आपली त्यांच्याशी ओळख करून दिली. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात होते व त्यांना उमेदवारांचे अर्ज, पैसे द्यायचे', असा आरोप तिने केला.
पूजाने सांगितले की, '२०१९ ते २०२२ या काळात आपण ज्या उमेदवारांचे अर्ज सरकारी नोकरीसाठी दिले होते, त्यापैकी कुणालाही नोकरी मिळाली नाही. आपल्याकडे पुरावे असून, माझे दोन्ही फोन पोलिसांनी चौकशीवेळी जप्त केले. त्यापैकी एक फोन डिचोली व दुसरा म्हार्दोळ पोलिसांनी जप्त केला.
पूजाने सांगितले की, या प्रकरणी २०२४ मध्ये मला पोलिसांनी अटक केली होती. एक महिन्यानंतर सुटका झाली. परंतु, आता पोलिस आपल्याला चौकशीसाठी बोलावून सतावणूक करत आहेत. मात्र, चौकशीत मी मंत्र्याचे नाव घेतले नाही. परंतु, आयएएस अधिकारी निखिल देसाई, पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अधिकारी उत्तम पार्सेकर यांची नावे घेतली.
नोकऱ्यांच्या व्यवहारात नऊ जणांची टीम होती
पूजा हिने सांगितले की, 'आमची नऊ जणांची टीम होती. ही टीम सरकारी नोकऱ्यांच्या व्यवहारात गुंतली होती. त्यापैकी काहीणजांना यापूर्वी पोलिसांकडून अटकही झाली आहे. मी सुमारे ८० हून अधिक जणांना सरकारी नोकरी लावली आहे.
मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही
'सरकारी नोकरी विक्री प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कुठलाही संबंध नाही. त्यांचा या व्यवहारात सहभाग नाही. ज्या कोणी आपल्याकडून पैसे घेतले होते, त्यांनी आपले पैसे परत करावेत', असे पूजा नाईकने सांगितले.
क्राइम ब्रँच चौकशीनंतरच मी बोलेन : सुदिन
'नोकरी विक्री प्रकरणात क्राइम ब्रँचने आधी चौकशी पूर्ण करू द्या. नंतरच मी बोलेन,' असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. पूजा नाईकच्या आरोपांबद्दल ढवळीकर म्हणाले की, 'मी कसा आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. माझे नाव कोणीच बदनाम करू शकणार नाही. कोणीही माझे नाव घेऊन काहीही आरोप करत असतील तर त्याला काही अर्थ नाही. पूजा नाईक माझ्याकडे कामाला नव्हतीच. माझ्या कार्यालयात काम केलेल्यांची माहिती हवे तर पोलिसांना वित्त खात्याकडून मिळू शकेल, कारण कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार व त्यांची माहिती तेथेच असते. गोमंतकीय जनता, पोलिस या सर्वांना मी कसा आहे हे ठाऊक आहे. मी नंतर भाष्य करीन.'
पूजा मगोपच्या कार्यालयात कामाला नव्हतीच : दीपक
'पूजा नाईक ही मगोपच्या कार्यालयात कधीच कामाला नव्हती', असे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. नोकरी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईकने केलेल्या आरोपांबाबत दीपक ढवळीकर म्हणाले की, '२००९ मध्ये आपण मगो पक्षाच्या कार्यालयात कामाला होते, असा दावा पूजा करत आहे. परंतु, प्रत्यक्षात आमच्या कार्यालयाचे सेलडीड २०१२ मध्ये झाले. २०१९ मध्ये पैशांचा व्यवहार झाला, असा आरोप ती करत आहे.
या काळात मगोप सत्तेत नव्हता. तिच्या विधानांमध्ये बऱ्याच विसंगती आहेत. तिला कोणीतरी शिकवून पाठवले आहे. मगोपला लक्ष्य करण्यासाठीच हे सर्व चालले आहे.' ढवळीकर म्हणाले की, 'मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानेच ती अशा प्रकारचे आरोप करत आहे. या आरोपांमागे कुठल्यातरी बाह्य शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मगो पक्षाला अन्याय्यपणे लक्ष्य केले जात असून विनाकारण या प्रकरणात ओढले जात आहे. याप्रकरणी क्राइम ब्रांचची चौकशी पुढील आठ दिवसात पूर्ण होईल व त्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल.'