फोंडा पोटनिवडणूक: रितेश नाईक, केतन भाटीकर भरणार अर्ज; आरजीचा काँग्रेसला पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:21 IST2026-03-23T13:21:55+5:302026-03-23T13:21:55+5:30

दळवी करणार भाजपचाच प्रचार

ponda bypoll election 2026 ritesh naik and ketan bhatikar to file nominations | फोंडा पोटनिवडणूक: रितेश नाईक, केतन भाटीकर भरणार अर्ज; आरजीचा काँग्रेसला पाठिंबा 

फोंडा पोटनिवडणूक: रितेश नाईक, केतन भाटीकर भरणार अर्ज; आरजीचा काँग्रेसला पाठिंबा 

फोंडा विधानसभा पोटनिवडणूक,  लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा/पणजी: फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, सोमवारी शेवटचा दिवस आहे. आज, भाजपचे उमेदवार व नगरसेवक रितेश नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार भाटीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांनी रितेश यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीसाठी १५ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने भाटीकर यांची तर भाजपने रितेश नाईक यांना तिकीट दिले. 'आप'ने गीतेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. भाटीकर यांच्या प्रचारात राजेश वेरेकर हेसुद्धा सहभागी आहेत. तिन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

२०२७ आघाडीबाबत आरजीची चर्चा : वीरश

आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी आगामी, २०२७ च्या निवडणुकीसाठी आघाडीबाबत लवकरच चर्चा सुरू करणार असल्याची माहिती दिली. वीरेश म्हणाले की, 'यासाठी पक्षाकडून विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती विविध पक्षांशी संवाद साधणार आहे. फोंडा पोटनिवडणुकीनंतर लगेच आघाडीच्या चर्चेला सुरुवात होईल.

काँग्रेसने आमच्यासोबत अद्याप आघाडीसाठी कुठलीच चर्चा केलेली नाही. त्यामुळे लोकांना विरोधकांची युती हवी असली तर काँग्रेस पक्ष यासाठी तयार नाही असे दिसते. पण तरीही आम्ही या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे मनोज परब म्हणाले.

काँग्रेसकडून स्वागत

दरम्यान, रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने काँग्रेस उमेदवाराला जाहीर केलेल्या पाठिंब्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी मनापासून स्वागत केले. या पाठिंब्यामुळे काँग्रेसची बाजू आता अधिक भक्कम झाली असून, दोन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तीमुळे काँग्रेस उमेदवाराचा विजय आता निश्चित झाला असल्याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

दळवींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी दिल्यानंतर बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांनी अखेर तलवार म्यान केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत भेटीनंतर रितेश यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला.

दोन दिवसांपूर्वी दळवी यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आर्दीनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी त्यांची व मुख्यमंत्र्यांची भेट झाली. या भेटीत दळवी यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. त्यानंतर दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. नगरसेवक शौनक बोरकर व पंच अभिजीत गावडे उपस्थित होते.

दळवी म्हणाले की, पक्षाने रितेश यांना उमेदवारी दिल्याने 3 हितचिंतक, समर्थक नाराज झाले. एवढी वर्षे पक्षासाठी काम करूनही आम्ही नेमके कुठे कमी पडलो, याचे स्पष्टीकरण आम्हाला हवे होते. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमची व्यथा मांडली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, उद्यापासून रितेश यांच्यासोबत प्रचार करू. भाजपकडे ही जागा कायम राहील, यासाठी प्रयत्न करू.

आरजी उमेदवार देणार नाही : परब

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजी) ने फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वतःचा उमेदवार न उभा करता काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. 'पक्षाने लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून, भाजपचा पराभव करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी रविवारी येथे पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार वीरेश बोरकर, विश्वेश नाईक व इतर नेते उपस्थित होते. काँग्रेसने आपल्याशी अद्याप चर्चा न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

परब म्हणाले की, 'काँग्रेसने आमच्यासोबत युतीसाठी चर्चा केलेली नाही. फोंडा पोटनिवडणुकीबाबत सध्या आमची काँग्रेससोबत कसलीच चर्चा झालेली नाही. पण, भाजपचा पराभव हा आरजीचा मुख्य हेतू आहे. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा या लोकांच्या भावनेमुळे आम्ही एक पाऊल मागे घेऊन हा निर्णय घेतला आहे. निर्णयासाठी आमच्या कार्यालयात बैठका झाल्या. कार्यकर्त्यांनी उमेदवार उभा करण्याची मागणी आमच्याकडे केली होती. तरीही आम्ही हा निर्णय घेतला.
 

Web Title : फोंडा उपचुनाव: नाइक, भाटीकर दाखिल करेंगे नामांकन; आरजीपी ने कांग्रेस का समर्थन किया

Web Summary : फोंडा उपचुनाव में रितेश नाइक (भाजपा) और केतन भाटीकर (कांग्रेस) नामांकन दाखिल करेंगे। आरजीपी ने भाजपा को हराने के उद्देश्य से भाटीकर का समर्थन किया। दलवी ने नाइक का समर्थन किया।

Web Title : Fonda By-Election: Naik, Bhatikar to File Nominations; RGP Backs Congress

Web Summary : Fonda by-election sees Ritesh Naik (BJP) and Ketan Bhatikar (Congress) filing nominations. RGP supports Bhatikar, aiming to defeat BJP. Dalvi backs Naik.