फोंडा पोटनिवडणूक, ९ एप्रिल रोजी मतदान; ४ मे रोजी निकाल, भाजप-काँग्रेसची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:41 IST2026-03-16T07:41:26+5:302026-03-16T07:41:26+5:30

लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा शक्य, यंत्रणा सज्ज

ponda by election voting on april 9 results on may 4 now bjp and congress ready for victory | फोंडा पोटनिवडणूक, ९ एप्रिल रोजी मतदान; ४ मे रोजी निकाल, भाजप-काँग्रेसची जय्यत तयारी

फोंडा पोटनिवडणूक, ९ एप्रिल रोजी मतदान; ४ मे रोजी निकाल, भाजप-काँग्रेसची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने फोंडा विधानसभा पोटनिवडणूक गुरुवार ९ एप्रिल रोजी, तर मतमोजणी ४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांनी आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या चार राज्यांसह पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा, तसेच विविध राज्यांतील आठ मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या.

फोंडा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना आज १६ मार्च रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ मार्चपर्यंत मुदत असेल. २४ मार्च रोजी छाननी होईल. २६ मार्च रोजी अर्ज मागे घेता येतील. ९ एप्रिल रोजी मतदान होईल. कृषीमंत्री रवी नाईक यांचे गेल्या १४ ऑक्टोबर रोजी निधन झाल्यानंतर होण्याची जागा रिक्त होती. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू झाली असून, विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरु आहे. फोंडा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले होते. उमेदवारांची अंतिम घोषणा झाल्यानंतर निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.

भाजपकडून दोन नावांची शिफारस

भाजपने पोटनिवडणुकीसाठी दोन नावांची शिफारस आधीच पाठवली असून, उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यापूर्वीच दिलेली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राज्य निवडणूक समितीच्या बैठकीतही संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत दोन नावांवर सहमती दर्शवून ती नावे पुढील प्रक्रियेसाठी पाठवली आहेत. रखींचे पुत्र रितेश-रॉयसाठी तिकीट मागणी होत असताना विश्वनाथ दळवी यांचे नावही चर्चेत आहे.

काँग्रेसची आज बैठक

दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश निवडणूक समितीची बैठक आज, सोमवारी होणार असून तींत संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. पक्षाचे प्रदेश प्रभारी सध्या गोव्यात असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. 'आम्ही लवकरच उमेदवार जाहीर करू', असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून राजेश वेरेंकर दावेदार आहेतच. शिवाय डॉ. केतन भाटीकर यांचे नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

रवी नाईक यांच्या राजकीय वारशामुळे आणि फोंडातील स्थानिक संपर्कामुळे कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी दिल्यास सहानुभूती मिळू शकते, असे काही भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जाणार आहे.

भाजप निश्चितच फोंडा मतदारसंघ राखणार : मुख्यमंत्री सावंत

फोंडा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आपल्याकडेच राखण्यात यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. कुर्टी येथील रवी नाईक क्रीडा संकुलमध्ये एका क्रिकेट स्पर्धेवेळी आले असताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. रवी नाईक यांनी पहिल्यांदा येथे भाजपचा झेंडा फडकवला होता. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची संधी फोंड्यातील नागरिक आम्हाला पुन्हा एकदा देतील. पोटनिवडणुकीत प्रचारासाठी कमी दिवस मिळणार असले तरी आमचे तळागाळात काम सुरू असल्याने ही निवडणूक जड जाणार नाही. पोटनिवडणूक असली तरी आम्ही संपूर्ण ताकद लावू, दिल्लीहून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होईल.
 

Web Title : फोंडा उपचुनाव: 9 अप्रैल को मतदान, 4 मई को परिणाम; भाजपा-कांग्रेस तैयार

Web Summary : फोंडा उपचुनाव 9 अप्रैल को, परिणाम 4 मई को। भाजपा और कांग्रेस तैयार, नामों पर विचार। रवि नाइक के निधन से रिक्ति। राजनीतिक गतिविधि तेज।

Web Title : Fonda By-Election: Voting April 9th, Results May 4th; BJP-Congress Ready

Web Summary : Fonda by-election on April 9th, results on May 4th. BJP and Congress gear up, names being considered. Vacancy due to Ravi Naik's death. Political activity increases.