लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:00 IST2025-10-21T05:59:53+5:302025-10-21T06:00:47+5:30
पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला आहे.

लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांतील नौदलाने निर्माण केलेला दरारा, हवाई दलाचे अद्वितीय कौशल्य आणि लष्करी जवानांचे शौर्य या तीन गोष्टींतील उत्तम समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने काही वेळातच गुडघे टेकले, असे कौतुकाचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले. आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेने पाकिस्तानची झोप उडविली, असेही ते म्हणाले. सैन्यदलांतील जवानांना मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
गोवा समुद्रकिनाऱ्याजवळ आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारत’चे प्रतीक आहे. विक्रांत या नावामुळेच शत्रूच्या उरात धडकी भरते. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री आयएनएस विक्रांतवर मुक्काम केला. या युद्धनौकेवरून उड्डाण करून लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई कसरतींचे पंतप्रधानांनी निरीक्षण केले.
‘भारताची संरक्षण निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नौदल, हवाई दल, भूदलासाठी लागणारी शस्त्रे आणि उपकरणे भारत मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकेल, अशी सज्जता आपण करत आहोत. जगातील सर्वोच्च संरक्षण निर्यातदार देशांमध्ये भारताचे नाव गणले जावे, यासाठी हे प्रयत्न आहेत. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
‘छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून नौदलाचा ध्वज’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला आहे. नौदलात २०२२ साली समाविष्ट झालेली आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांतवर पंतप्रधान मोदी यांच्यासमोर नौदल अधिकारी व नौसैनिकांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांना मिळालेल्या यशावर लिहिलेले एक विशेष गाणेही सादर करण्यात आले.