Panaji residents have to face water shortage for six days | पणजीवासियांना सहा दिवसांपासून करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना

पणजीवासियांना सहा दिवसांपासून करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना

पणजी : गेले सहा दिवस पणजीत पाण्याचा पुरवठा झालेला नाही. नळ कोरडे पडले असून पणजीवासियांत संतापाची लाट आहे. सोमवारी पणजीवासियांना पाणी मिळेल असे खोटेच सरकारने सांगितले. प्रत्यक्षात मंगळवारीही पाणी पुरवठा झाला नाही. आज बुधवारी रात्रीर्पयत पाण्याचा पुरवठा होईल, असा दावा आता सरकार करत आहे.

खांडेपार येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम चालले आहे. ते पाहण्यासाठी जाण्यास बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर यांना काल मंगळवारी मुहूर्त मिळाला. फोंडा तालुक्याचा काही भाग आणि तिसवाडी तालुक्याचा पूर्ण भाग पाणी समस्येमुळे सहा दिवस होरपळला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे टँकर अवघेच पणजीत फिरतात. पणजी वगळता तिसवाडीच्या अन्य भागांमध्ये तर लोकांचे  जास्तच हाल झाले. पणजीतील दुकानदारांकडील पाण्याच्या बाटल्या संपल्या. यामुळे पणजीतील लोकांना बार्देश तालुक्यात जाऊन पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत आणाव्या लागत आहेत. गेले सहा दिवस लोकांनी टँकरच्या पाण्यासाठी व बाटल्या खरेदी करण्यासाठी स्वत:च्या खिशातील बरेच पैसे खर्च केले. बांधकाम खात्याने अवघ्याच भागांत मोफत टँकर पुरविले. पणजी महापालिकेनेही काही भागांत मोफत टँकरद्वारे पाण्याची सोय केली. मात्र ते प्रमाण पुरेसे नाही. 

गोमेकॉलाही पाण्याचा पुरवठा होत नसल्याने तिथेही रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. तिसवाडीतील काही विद्यालयांमध्येही पाणी नाही. मशिदींमध्येही पाण्याची व्यवस्था बंद झाली आहे. छोटी हॉटेल्स व रेस्टॉरंटही पाणी कमी वापरण्याचे सल्ले ग्राहकांना देत आहेत. पणजीत अनेक लोक गेले सहा दिवस स्वत:चे फ्लॅट बंद करून आपल्या मूळ गावी राहिले आहेत. नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरच आपण आपल्या कुटूंबियांना फ्लॅटवर आणू, असे अनेक पणजीवासिय सांगत आहेत. पाणीप्रश्नी लोकांना दिलासा देण्यास शासकीय यंत्रणा पूर्ण अपयशी ठरली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे कोणतीच पर्यायी उपाययोजना नाही हे पणजीत सहा दिवस सिद्ध झाले. लोकांनी जुन्या विहिरींमधील एरव्ही कधीच वापरात नसलेले पाणी यावेळी वापरले. आज बुधवारी पहाटे पाच वाजता पणजीत पाणी पोहचेल असा दावा बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर यांनी केला तरी, प्रत्यक्षात बुधवारी रात्रीच पाणी पोहचू शकते.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. मी स्वत: मंगळवारी सकाळी दहा वाजता खांडेपारला भेट देऊन कामाची पाहणी केली. बुधवारी पहाटे पाच वाजता पणजीत पाणी पोहचेल असे मला तरी वाटते. - दिपक प्रभू पाऊसकर, बांधकाम मंत्री

Web Title: Panaji residents have to face water shortage for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.