मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:46 IST2025-10-09T09:45:38+5:302025-10-09T09:46:09+5:30
मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे; कुटुंबामध्ये संवाद वाढवण्याचे आवाहन

मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यात सध्या मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मनोरुग्ण इस्पितळांबाहेर लोक आपल्याच स्वकीयांनाच सोडूनही तिथून निघून जात आहेत. मात्र, अशा लोकांची काळजी सरकार घेते. सरकारच्या प्रोव्हेदोरीया या खात्याच्या गोव्यात असलेल्या १० ते १२ केंद्रांमध्ये आज ३५० ते ४०० अशा प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे यापुढे अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी लोकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथील रवींद्र भवनमध्ये बुधवारी गोवा ग्रामीण विकास खात्याच्या गोवा राज्य ग्रामीण उपजिविका मिशन व पद्मिनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मन' या महिलांसाठी मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू पोरोब, हरवळे सरपंच गौरवी नाईक, सुर्ल सरपंच साहिमा गावडे, आमोणा सरपंच सागर फडते, पाळीचे सरपंच संतोष नाईक, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, गोवा ग्रामीण विकास खात्याचे संचालक प्रेमराज शिरोडकर, डॉ. संगम पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी, समाजात महिला या सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याकडे पूर्णपणे लक्ष देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांच्या पुढाकाराने महिलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात आहे, असे म्हटले. संचालक प्रेमराज शिरोडकर, डॉ. संगम पाटील यांनीही यांनीही आपले विचार मांडले.
भावनांना वाट मोकळी करून द्या
मानसिक आजार हा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे लोकांना बोलते करणे गरजेचे आहे. आज दर १० लोकांमध्ये १ मानसिक रूग्ण सापडत आहे, ही चिंतेची बाब आहे. या धकाधकीच्या जीवनात महिलांकडून विविध गोष्टींमुळे घेण्यात येणाऱ्या ताणामुळे हे समस्या वाढत आहे. त्यासाठी महिलांनी आपल्या मनातील गोष्टी इतरांशी बोलून आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला हवी. घरातील कामांमध्ये गुरफटून राहणाऱ्या महिला आज स्वतःसाठी वेळच देऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःसाठी म्हणून वेळ द्यायला हवा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.