तेरेखोल नदी ओलांडून ओंकार पोहोचला महाराष्ट्रात; मडुरा-सातोसेतत वावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:18 IST2025-09-28T13:17:29+5:302025-09-28T13:18:50+5:30
गोवा वनखात्याचे अधिकारी नदी परिसरात तैनात

तेरेखोल नदी ओलांडून ओंकार पोहोचला महाराष्ट्रात; मडुरा-सातोसेतत वावर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : चार दिवसांनंतर ओंकार हत्ती तांबोसे गावातून तेरेखोल नदी ओलांडून महाराष्ट्रातील मडुरा-सातोसे भागात गेला आहे. या हत्तीला पुन्हा पेडणे तालुक्यात तेरेखोल नदीतून पाठविण्याचा तेथील शेतकऱ्यांचे प्रयत्न असतील.
हत्तीला पिटाळून लावण्यासाठी मोठमोठे गंडेल फटाके लावले जात आहेत. गोव्यातील वन खात्याचे कर्मचारी, अधिकारी अलीकडे तेरेखोल नदीच्या परिसरात ठाण मांडून आहेत. ओंकार हत्ती नदी ओलांडून पेडणे तालुक्यात येणार नाही ना याकडे लक्ष ठेवत आहे.
मागच्या दहा-बारा दिवसांपासून ओंकार हत्तीने कडशी, मोपा, तोरेसे, तांबोसे, उगवे भागात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसानी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून नुकसानभरपाई मिळालीच नाही. दुसऱ्या बाजूने सरकारने भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. परंतु उगवे भागातील शेतकरी गावकऱ्यांनी हत्तीला या भागातून पाठविण्याचा निर्धार केला होता.
हत्तीला पिटाळून लावण्यासाठी सरकार अपयशी ठरत असेल तर शेतात शेतकरी जाऊन ढोल, ताशे, गंडेल घेऊन त्या हत्तीला पिटाळण्याचा निर्धार करण्यासाठी रविवारी श्री देवी माऊली मंदिरात शेतकरी, ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. परंतु, दुपारीच ओमकार हत्ती महाराष्ट्रात गेल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
पुन्हा येणार पेडणेत ?
ओंकार हत्ती उगवेत आहे की महाराष्ट्रात हे वनखात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती नव्हते. मात्र, सोशल माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर मात्र वनखात्याचे कर्मचारी, अधिकारी जागृत झाले. ज्या ठिकाणी हत्ती सध्या मडुर-सिंधुदुर्ग या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे त्या ठिकाणी शेकडो शेतकरी जमा होऊन या हत्तीला परत अलीकडे पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी तांबोसे भागातील काही नागरिकांना दिलेली आहे.
पुन्हा तांबोसे, तोरसे, उगवेत येण्याची शक्यता
ओंकार परत तेरेखोल नदीतून अलीकडे येऊ नये यासाठी वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी किनाऱ्यावर तैनात झालेले आहेत. परंतु, ओंकार हत्तीच्या मनात काय असेल ? काय नाही ? याचा कुणाला ठाण पत्ता लागणार नाही. जर त्या भागातून हत्तीला पिटाळून लावले तर पुन्हा हत्ती तांबोसे, तोरसे, उगवे या भागात सहज तेरेखोल नदी ओलांडून येऊ शकतो.
तांबोसे गावातून सात दिवसांनंतर हत्ती उगवे परिसरात पोहोचला. तांबोसेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, अजूनपर्यंत सरकारकडून या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची भरपाई देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी. - राजन कोरगावकर, मिशन फॉर लोकल, पेडणे.