नोकरीकांडप्रकरणी नव्याने गुन्हा नोंद; गुन्हा शाखेने तपास सुरू केल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:37 IST2025-11-13T07:36:03+5:302025-11-13T07:37:07+5:30
आयएएस अधिकाऱ्यासह दोन सरकारी अधिकाऱ्यांना पूजाने सुमारे नोकऱ्यांसाठी १७ कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते.

नोकरीकांडप्रकरणी नव्याने गुन्हा नोंद; गुन्हा शाखेने तपास सुरू केल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कथित नोकरी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिच्या जबाबानंतर गुन्हे शाखेकडून नव्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आयएएस अधिकाऱ्यासह दोन सरकारी अधिकाऱ्यांना पूजाने सुमारे नोकऱ्यांसाठी १७ कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते.
याबाबत पूजाच्या जबाबानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना ही माहिती दिली. मात्र गुन्हा नेमका कुणाविरुद्ध नोंदविण्यात आला याविषयी त्यांनी काहीच माहिती दिली नाही.
दरम्यान, एक आयएएस अधिकारी आणि एका अभियंत्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे खोटे काय ते स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच या बाबतीचा निष्कर्ष सांगता येईल' असे सांगितले.
नोकरीकांड प्रकरणातील तपासाच्या अहवालासोबत गुन्हा नोंदविण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गुन्हे शाखेकडून सरकारला पाठविला होता. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळताच गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत पोलिस होते. बुधवारी सकाळी सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविला गेला.
पूजाची उशिरापर्यंत चौकशी
दरम्यान, पूजा नाईक हिला गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्री चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तिला घरी जाण्यास सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती.
तर 'त्या' अधिकाऱ्यांना बोलावणार
या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांना आपण २०१९ ते २०२१ या काळात सुमारे १७ कोटी रुपये दिले असल्याचा जबाब पूजा नाईकने दिला आहे, त्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेकडून समन्स बजावले जाणार आहेत. यापैकी एक अधिकारी हा गोव्याबाहेर असून त्यालाही गोव्यात बोलावून घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र ज्या मंत्र्यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून गाजत होते, त्या मंत्र्याचे नाव पूजाने नव्याने घेतलेल्या जबाबात घेतले नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.