राज्यात आयुर्वेदाच्या नव्या सुविधा सुरू; ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या सेवांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:09 IST2026-03-10T09:08:34+5:302026-03-10T09:09:48+5:30
आयुष हॉस्पिटलमध्ये प्रारंभ

राज्यात आयुर्वेदाच्या नव्या सुविधा सुरू; ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या सेवांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मोपा : आरोग्य सेवेला बळ देताना काल रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदच्या नव्या आरोग्य सुविधांचे धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये उद्घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेजा तसेच वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत संस्थेच्या कामांबाबत आढावा बैठकही झाली. मुख्यमंत्री सावंत यांनी संस्थेत सुरू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण केले. यामध्ये सुघृत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, कौमारभृत्य पंचकर्म युनिट, फिजिओथेरपी युनिट आणि बोन मिनरल डेन्सिटी युनिट यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, सुघृत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्समुळे आधुनिक पायाभूत सुविधांच्या सहाय्याने आयुर्वेदिक शस्त्रक्रिया अधिक सक्षमपणे आणि सुरक्षितरीत्या करता येतील.
भारतीय औषध प्रणाली संघटनेकडून स्वागत
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात आयुर्वेदसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले.
गोवा आयुर्वेदिक आणि इतर सहयोगी भारतीय औषध प्रणाली परिषदेच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांनी या निर्णयाचे स्वागत करताना आयुर्वेद क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळेल, असे सांगितले. डीडीएसएसवाय योजनेअंतर्गत उपचारांची व्याप्ती वाढविणे आणि राज्य कल्याण धोरणासारख्या उपक्रमांमुळे आयुर्वेद क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश कोरडे यांनी सरकार आयुर्वेदाला मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवेत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. टाटा मेमोरियल सेंटर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग रुग्णांसाठी एकात्मिक उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
'रुग्णकल्याणाला प्राधान्य'
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, 'या नव्या सुविधांमुळे गोव्यात आयुर्वेदिक आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढणार असून रुग्णांना अधिक प्रभावी, आधुनिक आणि सर्वसमावेशक उपचार मिळतील. आयुर्वेद आणि आधुनिक आरोग्यसेवेचा समन्वय साधून रुग्णकल्याणाला प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.'
'हाडांच्या समस्यांवर वेळेत उपचार'
मुख्यमंत्री म्हणाले, की फिजिओथेरपी युनिटमुळे रुग्णांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळणार असून विविध शारीरिक आजारांनंतर रुग्णांच्या पुनर्प्राप्तीसाठी आधुनिक उपचारसुविधा उपलब्ध होणार आहेत. बोन मिनरल डेन्सिटीमुळे हाडे ठिसूळ होण्याचे तसेच इतर संबंधित आजारांचे लवकर निदान करून योग्य व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या हाडांच्या समस्यांवर वेळेवर उपचार करणे सुलभ होईल. कौमारभृत्य पंचकर्म युनिटमुळे बालकांच्या आरोग्याशी संबंधित आयुर्वेदिक उपचारांना चालना मिळणार असून बाल आरोग्याच्या सर्वांगीण उपचारासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.